मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २० सप्टेंबरला महाराष्ट्रातील वर्ध्याला भेट देणार आहेत. सकाळी साडेअकराच्या सुमारास नरेंद्र मोदी येथे आयोजित पीएम विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाची प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. या कार्यक्रमादरम्यान पीएम विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना नरेंद्र मोदी हे प्रमाणपत्र आणि कर्ज वितरित करतील.
या कार्यक्रमात पीएम विश्वकर्मा योजनेतील यशस्वीगाथा दर्शविण्यासाठी थीम पॅव्हेलीयनची निर्मिती करण्यात आली असून त्यामध्ये देशभरातील १८ कारागिरांच्या कलाकृतींच्या प्रदर्शनाचा समावेश आहे. तसेच, कारागिरांनी जपलेला वारसा आणि समाजाला दिलेल्या निरंतर योगदानाबद्दल नरेंद्र मोदींच्या हस्ते पीएम विश्वकर्मा योजनेच्या यशोगाथेला समर्पित एका स्मृती टपाल तिकिटाचे अनावरण देखील होणार आहे.
याचबरोबर, या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्रातील अमरावती येथे प्रधानमंत्री मेगा इंटिग्रेटेड टेक्स्टाईल रिजन अँड अपारेल (पीएम मित्र) पार्कची पायाभरणीही होणार आहे. महाराष्ट्र् औद्योगिक विकास मंडळातर्फे राज्य अंमलबजावणी संस्था म्हणून हे पार्क १००० एकरात उभारण्यात येत आहे. सरकारने वस्त्रोद्योग उद्योगासाठी सात पीएम मित्र पार्क उभारण्याला मंजुरी दिली आहे. भारताला वस्त्रोद्योग आणि निर्यातीचे जागतिक केंद्र बनवण्याच्या सरकारच्या दृष्टिकोनाला प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.