पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे घणाघाती आरोप
वर्धा : यंदा काँग्रेसवाल्यांनी (Congress) तर आपल्या गणपती बाप्पाला थेट तुरुंगात टाकले होते. काँग्रेसने नेहमीच अर्बन नक्षलवादाचे समर्थन केले आहे. काँग्रेस हा बेईमान व भ्रष्टाचाऱ्यांचा पक्ष आहे. काँग्रेसने नेहमीच आमच्या आस्थेचा, श्रद्धेचा व संस्कृतीचा अपमान केला आहे. त्यांनी जर आपल्या संस्कृतीचा, आस्थेचा सन्मान केला असता तर त्यांनी गणेशोत्सवाचा, गणपती बाप्पाच्या पूजेचा विरोध केला नसता. हे लोक गणपती बाप्पाच्या पूजेचा विरोध करत असल्याचा घणाघाती आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काँग्रेसवर केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज वर्धा (Vardha) दौऱ्यावर असून वर्ध्यात त्यांच्या हस्ते अनेक विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. दरम्यान, यावेळी आयोजित जाहीर सभेत बोलताना मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, तुकडे-तुकडे गँगचे लोक व शहरी नक्षलवादी मिळून काँग्रेस पक्ष चालवत आहेत. कांग्रेस हा देशातील सर्वात अप्रामाणिक व भ्रष्ट पक्ष आहे. काँग्रेसचा शाही परिवार देशातील सर्वात भ्रष्ट परिवार म्हणून ओळखला जातो. काँग्रेसने आजवर आपली संस्कृती आपल्या आस्थेचा कधीच सन्मान केला नाही. गणेशोत्सव हा भारताच्या एकात्मतेचा उत्सव आहे आणि महाराष्ट्राची भूमी त्याची साक्षीदार आहे. काँग्रेसने मात्र या गणेशोत्सवाचा तिरस्कार केला आहे. अलीकडेच मी गणेशोत्सवाच्या एका कार्यक्रमात सहभागी झालो होतो. ते पाहून काँग्रेसचा जळफळाट झाला. त्यांचे तुष्टीकरणाचे भूत जागे झाले. त्यांनी गणेश पूजनाच्या कार्यक्रमाचा विरोध केला. एका वर्गाचे, समाजाचे तुष्टीकरण करण्यासाठी काँग्रेस काहीही करू शकते, असे सांगत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसच्या भूमिकेचा पंचनामाच केला.
काँग्रेसने गणपती बाप्पाला तुरुंगात टाकले
नरेंद्र मोदी म्हणाले, कर्नाटकमध्ये तर काँग्रेसने कहर केला. त्यांचा गणेशोत्सवाला एवढा विरोध आहे की त्यांनी गणपती बाप्पाला तुरुंगात टाकलं. ज्या गणेश मूर्तीची लोक पूजा करत होते ती मूर्ती पोलिसांच्या व्हॅनमध्ये टाकून पोलीस ठाण्यात नेली. काँग्रेसमधील देशभक्तीची भावना संपली आहे. परदेशातून बसून ते अजेंडा चालवतात. जुन्या सरकारमध्ये कामगारांच्या कौशल्याचा आदर केला जात नव्हता. काँग्रेस आणि त्यांच्या मित्रांनी एससी/एसटीला दडपून ठेवले. त्यांना पुढे जाऊ दिले नसल्याचे यावेळी पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
पीएम मित्रा पार्क: आर्थिक क्रांतीचे पाऊल
अमरावतीतील पीएम मित्रा पार्कच्या उभारणीसंदर्भात मोदींनी सांगितलं की, हा प्रकल्प विकसीत भारताच्या संकल्पनेला गती देणार आहे. त्यांनी नमूद केले की, या टेक्स्टाईल पार्कमुळे ८ ते १० हजार कोटींची गुंतवणूक होईल आणि हजारो रोजगारांची निर्मिती होईल. यामुळे कापसाला चांगला भाव मिळेल आणि शेतकऱ्यांचे आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. विश्वकर्मा योजनेचं उद्दिष्ट सन्मान, सशक्तीकरण आणि समृद्धी हे आहे. योजनेअंतर्गत देशातील ७०० पेक्षा अधिक जिल्हे आणि अडीच लाखांहून अधिक ग्रामपंचायतींनी अभियानाला गती दिली आहे. वर्षभरात २० लाख लोक या योजनेत सहभागी झाले असून ८ लाख कारागीरांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले आहे. विशेषतः महाराष्ट्रात ७ हजार कारागिरांना प्रशिक्षण देण्यात आले आहे आणि साडेसहा लाखांहून अधिक लोकांना आधुनिक उपकरणे उपलब्ध करून दिली आहेत.
महाराष्ट्राचा विकास मोदींच्या नेतृत्वाखाली होईल
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, तिसऱ्या क्रमांकावरील अर्थव्यवस्था करण्यासाठी आम्ही दिवसरात्र मेहनत घेत आहोत. जगभरात देशाचा मान मोदींनी वाढवला, तसेच दहशतवादी निधीला त्यांनी रोख लावला. पण आपल्यातले काही लोक बाहेरील देशात जाऊन देशाची बदनामी करत आहे. संविधान रद्द करण्याची भाषा बोलत आहेत. पण नरेंद्र मोदी सत्तेवर आहेत, तोपर्यंत कुणी मायका लाल बाबासाहेबांनी दिलेले आरक्षण रद्द करू शकत नाही. मोदींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र हा विकासाच्या नव्या स्तरावर पोहोचतो आहे. बुलेट ट्रेनच्या वेगाने महाराष्ट्राचा विकास मोदींच्या नेतृत्वाखाली होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.