अमरावती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्धा वरून अमरावती टेक्सटाईल पार्कचे ई भूमिपूजन झाले. अमरावती एमआयडीसी याठिकाणी ई कार्यक्रम ठिकाणी भाजपा खासदार अनिल बोंडे, माजी खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा आणि इतर नेते मंडळी आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी नवनीत राणा यांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.
देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती टेक्सटाईल पार्कसाठी नवनीत राणा यांनी देखील पाठपुरावा केला, असा उल्लेख करताच नवनीत राणा ह्या भावुक झाल्या. यावेळी नवनीत राणांशी बातचीत केली तेव्हा त्या म्हणाल्या की, ते आनंदाचे अश्रू होते.
पीएम मित्रा योजनेअंतर्गत केंद्र सरकारने अमरावतीमध्ये मेगा टेक्सटाईल पार्क घोषित केला आहे. देशात सात शहरांत अशाप्रकारचे पार्क होणार असून यामध्ये अमरावतीचा समावेश आहे. अमरावतीच्या प्रकल्पात १० हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. यात तब्बल ३ लाख लोकांना रोजगार मिळणार असल्याने मोठ्या प्रमाणावर विदर्भातील युवकांना रोजगार मिळणार आहे. नांदगाव पेठ औद्योगीक वसाहतीत हा प्रकल्प होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ई भूमिपूजन झाले.