मुंबई: मुंबईचा गणेशोत्सव म्हटले की लालबागच्या राजाचे नाव पहिले तोंडावर येते. लालबागचा राजा, नवसाला पावणारा राजा अशी या गणपतीची ओळख आहे. त्यामुळे देशातूनच नव्हे तर परदेशातूनही भक्तगण आपल्या लाडक्या राजाच्या चरणी लीन होण्यासाठी येतात.
गणपतीच्या दहा दिवसांत तर लालबागच्या राजाच्या दरबारात भक्तांची प्रचंड गर्दी असते. दररोज लाखो भाविक राजाचे दर्शन घेतात. तितकेच भरभरून दानही आपल्या राजासाठी अर्पण करतात. दहा दिवसांमध्ये राजाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या इतकी प्रचंड असते की अनेकदा गर्दीवर नियंत्रण मिळवता येत नाही.
दरम्यान, यंदाची राजाच्या चरणी भक्तांकडून भरभरून दान करण्यात आले आहे. ७ सप्टेंबरला गणपती विराजमान झाले.
गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत लालबागच्या राजाला ५ कोटी ६५ लाख ९० हजार रोख रुपये दान करण्यात आले आहेत. ही केवळ रोख रक्कम आहे. सोने-चांदीचीही मोठ्या प्रमाणात भक्तांकडून दान करण्यात आले आहे.
गणपतीच्या दहा दिवसांमध्ये भक्तांनी तब्बल ४१५१.३६ ग्रॅम सोने राजासाठी अर्पण केले. तर ६४३२१ ग्रॅम चांदी लालबागच्या राजाला अर्पण करण्यात आली.