गणेशोत्सव काळात २१ लाख ३३ हजाराचे जादा उत्पन्न
महाड : कोकणात मोठ्या प्रमाणात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवासाठी महाड पोलादपूर तालुक्यात येणाऱ्या आणि त्यांच्या परतीच्या प्रवासासाठी महाड एस.टी.आगारातून मुंबई,मुंबई उपनगर,पुणे या मार्गावर जादा बसेस व जादा फेऱ्या सोडण्यात आल्या होत्या. गणेशोत्सव काळात महाड एस.टी.आगाराने ५७५३५ किमी जादा वाहतुक केली असून आगाराला या काळात तब्बल २१ लाख ३३ हजाराचे जादा उत्पन्न मिळाले.
गणेशोत्सवासाठी महाड पोलादपूर तालुक्यातील गणेश भक्तांना येण्यासाठी महाड एस टी आगारातून दि. ५ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर दरम्यान मुंबई पुणे व मुंबई उपनगरातून नियमित फेऱ्यांव्यतिरिक्त जादा फेऱ्या सोडण्यात आल्या होत्या. या कालावधीत महाड आगारातून नियमित भारमाना व्यतिरिक्त १५ ७८१ किमी जादा वाहतुक केली गेली यातून आगाराला ५ लाख ८३ हजार ५०६ रुपयाचे जादा उत्पन्न मिळाले. तर गणेशोत्सवा करीता आलेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी महाड आगारातून दि. १२ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर पर्यत ४१७५४ किमीची जादा वाहतुक करण्यात आली यातून महाड आगाराला १५ लाख ५० हजार २८६ रुपयांचे जास्त उत्पन्न मिळाले. या काळात महाड आगारातून नियमित फेऱ्यांव्यतिरिक्त जादा फेऱ्या, ग्रुप बुकिंग अशा बसेस सोडण्यात आल्या.यामुळे गणेशोत्सवात महाड आगाराने तब्बल २१ लाख ३३ हजाराचे जादा उत्पन्न कमावले.