आजपासून हॉस्पिटलमध्ये अत्यावश्यक सेवा पुन्हा होणार सुरु
नवी दिल्ली : कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेजमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ डॉक्टरांनी संप सुरु केला होता. दरम्यान, तब्बल ४१ दिवसांनतर सुरू असलेला संप मागे घेत असल्याची घोषणा ज्युनियर डॉक्टरांनी केली आहे. २१ सप्टेंबरपासून हॉस्पिटलमध्ये अत्यावश्यक सेवा पुन्हा सुरू करणार आहेत. मात्र, ओपीडी सेवा काही काळासाठी बंद राहणार आहे.
शनिवारपासून डॉक्टर आपत्कालीन सेवा देण्यास सुरुवात करतील. ते सध्या आउटडोअर आणि इनडोअर सेवांमध्ये सहभागी होणार नाहीत. टप्प्याटप्प्याने संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आंदोलनाला पाठिंबा देत गुरुवारी राज्यातील वरिष्ठ डॉक्टरांनीही कनिष्ठ डॉक्टरांना संप मागे घेण्याचे आवाहन केले होते.
सरकारने डॉक्टरांच्या बहुतांश मागण्या केल्या मान्य
पश्चिम बंगाल सरकारने डॉक्टरांनी मांडलेल्या बहुतांश मागण्या मान्य केल्या आहेत. यानंतर आंदोलक ज्युनिअर डॉक्टरांनी शनिवारपासून आपले आंदोलन अंशत: संपवून सरकारी रुग्णालयांना सेवा देण्याचे जाहीर केले आहे. महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्येच्या घटनेनंतर डॉक्टरांनी गेल्या ४१ दिवसांपासून कामबंद आंदोलन केले. आंदोलन संपवण्यापूर्वी ते राज्य आरोग्य विभागाच्या मुख्यालय स्वास्थ्य भवन ते सॉल्ट लेक परिसरातील सीजीओ कॉम्प्लेक्स येथील सीबीआय कार्यालयापर्यंत मोर्चा काढतील. एका आंदोलक डॉक्टराने त्यांच्या सर्वसाधारण सभेनंतर सांगितले की, पश्चिम बंगालमधील पूरस्थिती लक्षात घेता आणि राज्य सरकारने आमच्या काही मागण्या मान्य केल्याने आम्ही शनिवारपासून आपत्कालीन सेवा सुरु करत असल्याचे म्हटले आहे.