ठाणे : गणेशोत्सवानंतर महापालिकेने (Municipality) अनेक भागातील पाईप लाईन दुरुस्तीचे काम (Repairing) पुन्हा हाती घेतले आहे. यादरम्यान अनेक ठिकाणी पाणीपुरवठा बंद राहणार असून काही ठिकाणी कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी वेळेआधीच पाण्याचा जास्तीचा साठा उपलब्ध करुन ठेवावा, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. कालच पुणे शहरातील पिंपरी चिंचवड भागात दुरुस्तीच्या कामामुळे त्या परिसरातील नागरिकांना दिवसभर पाणीपुरवठा करण्यात आला नव्हता. त्यानंतर आता ठाण्यातही (Thane) पाईप लाईन दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. यामुळे अनेक भागातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्याच्या औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेतंर्गत पाईप लाईन दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम पूर्ण होण्यास २४ तासांचा कालावधी लागणार असून उद्या संपूर्ण दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तर पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.
कोणत्या भागात पाणी पुरवठा बंद?
ठाणे महापालिकेअंतर्गत प्रभाग २६ व ३१ चा काही भाग वगळता दिवा, मुंब्रा यासह कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागांमध्ये व वागळे प्रभाग समितीमधील रुपादेवी पाडा, किसन नगर नं. २, नेहरुनगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणी पुरवठा २४ तासासाठी पूर्णपणे बंद राहील.