ज्ञानेश्वरी – प्रा. मनीषा रत्नाकर रावराणे
भगवद्गीता हा प्रवास आहे. भेदभावाकडून एकरूपतेकडे जाण्याचा हा ज्ञानमय प्रवास! श्रीकृष्णकृपेने, मार्गदर्शनाने अर्जुन तो पार करतो. त्यामुळे त्याला अत्यंत आनंद होतो. तो श्रीकृष्णांना म्हणतो, ‘तर सर्व देवांचे राजे जे तुम्ही, ते मला जी आज्ञा कराल ती मी पाळीन. फार काय! वाटेल त्याविषयी मला आज्ञा करा.’ ओवी क्र. १५७५
अर्जुनाची आनंदाने ओसंडणारी अवस्था या ओवीतून ज्ञानदेव आपल्यापुढे साकार करतात. त्याचबरोबर अर्जुनाच्या ठिकाणी असणारी श्रीकृष्णांविषयीची निष्ठा, आदरही ते आपल्यापुढे मांडतात. आता अर्जुनाच्या या बोलण्यावर देवांची जी प्रतिक्रिया आहे, ती ज्ञानेश्वरांच्या कल्पकतेची बहार आहे. त्या अवीट गोडीच्या ओव्या आपण आता पाहूया.
‘हे अर्जुनाचे भाषण ऐकून देव सुखाने अति हर्ष पावून प्रेमाने नाचू लागले आणि म्हणाले की, या विश्वरूप फळाला मला अर्जुन हे एक फलच उत्पन्न झाले।’ ओवी क्र. १५७६
‘यया अर्जुनाचिया बोला। देवो नाचे सुखें भुलला।
म्हणे विश्वफळा जाला।
फळ हा मज॥’
अर्जुन हा श्रीकृष्णांचा केवळ शिष्य नाही तर तो आवडता, आदर्श असा शिष्य आहे. अशा शिष्याने आपल्याकडून सारं ज्ञान ग्रहण करावं ही गुरूंची इच्छा, अपेक्षा असते. ती अर्जुनाने पूर्ण केली. त्यावेळी त्यांच्या ठिकाणी हा संवाद देण्यात ज्ञानदेव काय सांगू इच्छितात? श्रीकृष्ण हे जगत् व्यापक परमात्मा होते. म्हणून ते विश्वरूप असलेले होय. त्यांना आलेलं फळ म्हणजे अर्जुन. फळ हा झाडाचा एक घटक होय. त्याप्रमाणे अर्जुन हा श्रीकृष्णांचाच एक भाग आहे. पुन्हा फळ ही झाडाच्या विकासाची सर्वोच्च अवस्था आहे. झाडाची परिणती फळ येण्यात होते. म्हणूनच व्यवहारातही आपण एखाद्या कार्यात यश मिळवलं की म्हणतो, सफल झालो.
त्याप्रमाणे इथे अठराव्या अध्यायात ज्ञानप्राप्ती झाल्याने अर्जुन आणि श्रीकृष्ण दोघेही ‘सफल’ झाले. पुन्हा फळ म्हणताना अनेकदा फळाला सुगंध असतो. त्याला एक छान चव असते. इथे अर्जुनालाही कीर्तीचा सुगंध लाभला आहे. साक्षात परब्रह्माकडून परम ज्ञान मिळाल्याने. म्हणून अर्जुन हे फळ ही कल्पना आपल्या मनाला भावते.
पुढे ज्ञानदेव अजून सुंदर दृष्टान्त योजतात. ‘पूर्ण कलेने युक्त असा आपला मुलगा जो चंद्र, त्याला पाहून क्षीरसागर मर्यादा विसरत नाही काय?’
ओवी क्र. १५७७
‘असे संवादरूपी बोहल्यावर हृदयस्थ खुणेने श्रीकृष्ण भगवान आणि अर्जुन या दोघांचे लग्न लागलेले पाहून संजय तल्लीन झाला.’ ओवी क्र. १५७८
श्रीकृष्ण हे क्षीरसागर तर अर्जुन हा चंद्र होय. कसा चंद्र? तर पूर्ण चंद्र, कारण अर्जुन हा मूळचा प्रज्ञावंत शिष्य. पुन्हा देवांकडून सर्व ज्ञान ग्रहण केल्यावर आता तो पूर्णचंद्रच झाला आहे. मग अशा चंद्राला पाहून दूधसागर उचंबळतो, त्याप्रमाणे देवांची अवस्था झाली आहे.
त्याहीपुढे जाऊन ज्ञानदेवांची प्रतिभा कथन करते, श्रीकृष्णार्जुनांचं लग्न लागलेलं आहे. एकरूपतेची उच्च अवस्था म्हणजे लग्न होय. दोन आहेत, ते एक होणं म्हणजे लग्न होय. त्याप्रमाणे श्रीकृष्ण-अर्जुन एक झाले आहेत. इथे बोहला कोणता? तर संवादाचा. संवादातून ते एकमेकांच्या जवळ येतात, मग एकरूप होतात अशीही कल्पना ज्ञानदेव योजतात.
श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या नात्यातील हा अनोखा संगम ज्ञानदेव त्यांच्या प्रज्ञेने चितारतात. त्यातून ते आपल्याही प्रज्ञेचं पोषण करतात.
आपल्या मनाचंही मिलन घडवतात.
असा हा सफळ सहप्रवास ज्ञानदेवांसह!