चेन्नई : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गुरुवारपासून खेळला गेला. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आले. या सामन्यात भारताची टॉप ऑर्डर फ्लॉप ठरली. रोहित शर्मा आणि विराट कोहली प्रत्येकी सहा धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले, तर शुबमन गिल खाते न उघडता बाद झाला. तिघांनाही हसन महमूदने बाद केले. यानंतर चाहते शून्यावर बाद झालेल्या शुभमनला सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत. सोशल मीडियावर काही यूजर्स त्याला ‘भारताचा बाबर आझम’ असेही म्हणत आहेत.
शुबमन गिल कसोटीत तिसऱ्यांदा शून्यावर बाद
यावर्षी शुबमन गिलला कसोटीत तिसऱ्यांदा खाते उघडता आले नाही. याआधी इंग्लंडविरुद्ध जानेवारीत हैदराबाद कसोटी आणि फेब्रुवारीत विशाखापट्टणम कसोटीत त्याला खातेही उघडता आले नव्हते. तो पाच वेळा कसोटीत शून्यावर बाद झाला आहे. शुबमनच्या शेवटच्या १० डावातील कामगिरी ०, ११०, ५२, ३८, ९१, ०, १०४, ३४, ० आणि १२ धावा अशी आहे.
बांगलादेशविरुद्ध त्याच्याकडून दमदार कामगिरीची अपेक्षा होती. शुबमन गिलने आतापर्यंत ४७ कसोटी डावांमध्ये चार शतके आणि सहा अर्धशतकांच्या मदतीने १४९२ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ३५.५२ इतकी आहे. त्याला कसोटीत पाचही वेळा भारतात खाते उघडता आलेले नाही. विशेष म्हणजे तिसऱ्या क्रमांकावर खेळताना त्याचे तीन वेळा शून्यावर बाद झाला आहे.