जीवन संगीत – सद्गुरू वामनराव पै
परमेश्वर हा विषय जर लोकांना कळला, पूर्णपणे लोकांना समाजाला तर लोक सुखी होतील हा आमचा सिद्धांत आहे. आम्ही प्रबोधन करताना गावोगावी, शहरोशहरी अगदी अमेरिकेपर्यंत जाऊन आलो ते कशासाठी? कारण हा विषय लोकांना समाजाला पाहिजे.
निसर्गाचे नियम मानवी जीवनात अत्यंत महत्त्वाचे आहेत. आपण करतो ते कर्मही महत्त्वाचे आहे. प्रत्यक्षात निसर्गाचे नियम आणि परमेश्वर हे वेगळे नाहीच, म्हणूनच ते परमेश्वराचे अवयव आहेत असे मी म्हटलेले आहे. जसे आपले अवयव आपल्यापासून वेगळे नाहीत तसे निसर्गाचे नियम हे परमेश्वरापासून वेगळे नाहीत. ते परमेश्वरापासून कधीच विलग होऊ शकत नाहीत आणि परमेश्वर देखील निसर्गनियमांना कधीही डावलत नाही. माणसे नियम बनवतात व नियम मोडतात. कायदे करतात व कायदे करणारेच ते कायदे मोडतात, इतकेच काय तर कायदे मोडून निवडून आल्यावर ते मंत्रीसुद्धा होतात हे आपण पाहत आहोत. मी हे काही नवीन सांगत नाही. आपण हे पाहतो, पेपरमध्ये वाचतो. लोकांना जरी निसर्गनियम कळले नाहीत तरी निसर्गनियमांचा अनुभव नक्कीच येतो आणि हा अनुभव निसर्गनियमांमुळेच हेही लक्षात येत नाही. माणसे दोष कोणाला देतात? दुसऱ्याला.
आपल्या घरात भांडणतंटे झाले, मुले शिकेनाशी झाली की कोणीतरी करणी केली असा विचार केला जातो. नको त्या गोष्टींच्या आहारी लोक गेलेले आहेत. अगदी सुशिक्षित लोक अंगात येणाऱ्या बुवाबाबांच्या घरासमोर रांगा लावतात. हे का होते? याचे कारण निसर्ग नियम कोणीही समजून घेत नाहीत. त्याच्यानुसार आपले जीवन चाललेले आहे हे कोणीच लक्षात घेत नाही. या सर्वामध्ये आपले कर्म महत्त्वाचे आहे.
कर्म म्हणजेच ब्रह्मदेव आहे. ब्रह्मदेवाला जशी ४ तोंडे तशीच कर्माला ही ४ तोंडे आहेत. पुराणानुसार ब्रह्मदेव उत्पत्ती करतो, विष्णू स्थितीला राखतो व शंकर विनाश करतो. या तिन्ही गोष्टी कर्मातून होत असतात. कर्मच ब्रह्मदेव, कर्मच विष्णू व कर्मच शंकर आहे. सांगायचा मुद्दा हे जे कर्म आहे ते सत्कर्म आणि दुष्कर्म असे दोन प्रकारचे असते. शुभ कर्म व अशुभ कर्म असे कर्माचे दोन प्रकार आहेत. म्हणून कर्माच्या ठिकाणी म्हणजेच कर्म करताना आपण सावध राहिले पाहिजे.