नाशिक : सिडकोतील भाजपाचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांनी पोलीस स्टेशनमध्ये अर्ज करून उबाठा शिवसेना जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका व्यक्तीने फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली आणि या व्यक्तीने शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर आणि त्यांचा मुलगा दीपक बडगुजर यांच्या प्रकरणात हस्तक्षेप करू नये अशी मागणी केली.
या सर्व प्रकरणावरती आज गुरुवारी मुकेश शहाणे यांनी अंबड पोलीस ठाण्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी झालेल्या घटनेबाबत चर्चा केली. यावेळी सिडको परिसरातील भाजपाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते.
माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांनी याबाबत बोलताना सांगितले की सुधाकर बडगुजर यांनी कार्यकर्त्यांना सांगून हा फोन केला आहे. यामध्ये दोन सराईत गुंडांची देखील नावं असून त्यांच्यावर देखील कारवाई करावी या मागणीसह त्यांनी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.