Monday, April 28, 2025
Homeब्रेकिंग न्यूजRaj Thackeray : राज ठाकरे यांचे ‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावावर टीकास्त्र!

Raj Thackeray : राज ठाकरे यांचे ‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावावर टीकास्त्र!

राज ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चेला नवीन वळण

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केंद्र सरकारच्या ‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावावर टीकास्त्र सोडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या कॅबिनेटने या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर राज ठाकरे यांनी फेसबुकवरून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यात त्यांनी सरकारच्या या निर्णयावर काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत आणि टीका केली आहे की या संकल्पनेत अनेक अस्पष्ट गोष्टी असल्याचे दिसून येते.

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘एक देश एक निवडणूक’ संकल्पनेला आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली. अर्थात ही फक्त केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता आहे आणि अजून याला संसदेची मान्यता लागेल. आणि अर्थात देशातील प्रत्येक राज्याचा कौल पण विचारात घ्यावाच लागेल. आणि कौलचा अर्थ वरवरची मान्यता नाही तर अशा प्रकारांनी राज्यांच्या अधिकारांना, स्वायत्ततेला धक्का पोहचणार नाही, याची खातरजमा पण व्हायलाच हवी.

‘एक देश एक निवडणूक’ संकल्पनेला आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली. अर्थात ही फक्त केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता आहे…

Posted by Raj Thackeray on Wednesday 18 September 2024

 

बरं जर एखाद्या राज्यात सरकार कोसळलं किंवा तिथली विधानसभा बरखास्त झाली तर तिकडे आधी निवडणूक होणार का? त्या राज्याने लोकसभेचा कार्यकाळ संपेपर्यंत वाट पहायची? किंवा समजा काही कारणांनी लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका लागल्या तर देशातील सगळ्या निवडणुका परत होणार का? असा कुठलाच खुलासा झालेला नाही.

तो कदाचित होईल. पण ‘एक देश एक निवडणूक’ हे सर्व ठीक आहे, आधी राज्यातल्या महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुका घ्या. येत्या ऑक्टोबर २०२४ मध्ये कित्येक महापालिकांमध्ये, नगरपालिकांमध्ये प्रशासक येऊन ४ वर्ष होतील. इतका काळ नगरसेवक नाहीत म्हणजे लोकप्रतिनिधी नाहीत. ते जास्त महत्वाचं नाही का? स्थानिक स्वराज्य संस्थांचा थेट संबंध सामान्य माणसांच्या जगण्याशी, त्यांच्या प्रश्नांशी असतो. त्याच्याच निवडणुका होत नसतील तर सामान्य माणसाने जायचं कोणाकडे? असा सवाल राज यांनी उपस्थित केला आहे.

तसेच निवडणुकांचं महत्व इतकंच वाटतंय तर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. राज ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे ‘एक देश, एक निवडणूक’ संकल्पनेवर राजकीय चर्चेला नवीन वळण मिळाले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -