Tuesday, April 22, 2025
Homeसंपादकीयअग्रलेखपुढच्या वर्षी लवकर या!

पुढच्या वर्षी लवकर या!

घराघरात चैतन्य घेऊन आलेल्या गणपती बाप्पाची आराधना करताना ११ दिवस कधी संपले, कळलेच नाही. मुंबई शहरात साजऱ्या झालेल्या या आनंदोत्सवाची मंगळवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी सांगता झाली. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! ‘गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला…’ अशा घोषणा देत मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणपतींसह पुणे शहरातील मानाचे गणपती, विविध मंडळे आणि नागरिकांना बाप्पाला निरोप देण्यात आला. लाडक्या सुखकर्ता, विघ्नहर्ता बाप्पाच्या स्वागतासाठी २५ दिवसांपूर्वी जी लगबग सुरू झाली होती, त्याला आता उसंत मिळाली.

अनंत चतुर्दशीला ठिकठिकाणांहून विसर्जनस्थळाच्या दिशेने गणेश विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या. ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतशबाजी आणि गणेश नामाचा जप करीत भाविक मोठ्या संख्येने या मिरवणुकांमध्ये सहभागी झाले. रखरखत्या उन्हातही गणेशभक्तांचा उत्साह कायम होता. गणरायांच्या दर्शनासाठी गिरगाव, लालबाग-परळ, दादर आदी विविध परिसर गर्दीने फुलून गेला होता. बहुसंख्य नागरिक गणेश विसर्जन सोहळा पाहण्यासाठी गिरगाव, दादर, जुहू चौपाटीवर दाखल झाले. लाखो गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या लालबागच्या राजाला अखेर निरोप दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी सकाळी १० वाजता देण्यात आला. गिरगाव चौपाटीवर हजारो भक्तांच्या उपस्थितीत जवळपास २५ तास विसर्जन मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचे विसर्जन संपन्न झाले. पुढच्या वर्षी लवकर या…च्या जयघोषात लालबागच्या राजाला निरोप देण्यात आला. देश-विदेशातील पर्यटकांनी गणेश विसर्जन सोहळ्याचे दर्शन घडविण्यासाठी पर्यटन विभागाने आंतरराष्ट्रीय गणेश महोत्सवांतर्गत उभारलेल्या विशेष गणेश दर्शन गॅलरीत मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. सर्व राजकीय मतभेद विसरून नेतेमंडळी गणरायासमोर नतमस्तक होताना पाहायला मिळाले. मुंबई शहरात गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीचा सोहळा हा एक इव्हेंट झाला असला तरी, त्यातील धार्मिक सद्भावना आजही कायम असल्याचे जाणवते.

तसा, पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत हजारो गणेशभक्त सहभागी होत असल्याने, त्याची चर्चा राज्यभर होते. बाप्पाला वाजत-गाजत निरोप देण्यासाठी पुण्यातील कसबा पेठ, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा या मानाच्या मंडळाच्या गणपती मंडळांसह सर्वच मंडळांच्या मिरवणुकांमध्ये पारंपरिक वाद्ये, विविध कला पथके सहभागी झाली होती. मुख्य मिरवणूक मार्गावर रांगोळीचे गालिचे काढण्याचे नियोजन करण्यात आले होते. गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी शहरातील मुख्य घाटांसह उपनगरांत हौदांची व्यवस्था करण्यात आली. उत्सव अनुभवण्यासाठी विविध राज्यांतील, विदेशांतील पर्यटक यंदाही पुण्यात आले होते. यावर्षी आणखी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. वाढत्या गर्दीमुळे उत्साहात वाढ झाली असली तरी, गेल्या काही वर्षांत उत्सवाच्या नावाखाली जो गोंधळ सुरू आहे, तोही चिंताजनक आहे. लाऊडस्पीकरच्या आवाजावर मर्यादा असाव्यात, त्याचे उल्लंघन होऊ नये असे प्रत्येक गणेशोत्सव मंडळांना परवानगी देताना अट टाकण्यात आली असली तरी, गणेश मिरवणुकीत अनेक मंडळांकडून नियम धाब्यावर बसविण्यात आल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले. ढोल-ताशा, डीजेमुळे कानठळ्या बसवणारा आवाज कोणी रोखायचा हा प्रश्न निर्माण झाला. पोलीस प्रशासनाची हतबलता यावेळी प्रकर्षाने दिसून आली. त्याचा उलटा परिणाम पाहायला मिळाला.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी ईदनिमित्त भव्य मिरवणुका निघाल्या. या मिरवणुकांमधील कर्णकर्कश आवाजाचा त्रास होत असला तरी, तो कोणाला सांगणार अशी केविलवाणी स्थिती सर्वसामान्यांची झाली. उत्सवाच्या आनंदोत्सवापुढे तक्रारीचा पाढा वाचण्यात काही अर्थ नाही, अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. असो. राज्यात ठिकठिकाणी सुरू असलेले सांस्कृतिक कार्यक्रम, स्तोत्र पठण, गणेशवंदना, पारंपरिक वाद्यांच्या मिरवणुका, धार्मिक कार्यक्रमांमुळे वातावरण गणेशमय झाले, ही जमेची बाजू मानायला हरकत नाही. शहरातील प्रत्येकाने हा आनंदोत्सव साजरा केला. यंदाच्या वर्षी गणेश चतुर्थी ही शनिवारी ७ सप्टेंबर २०२४ ला होती, तर पुढच्या वर्षी गणेश चतुर्थी ही २७ ऑगस्ट २०२५ ला असणार आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी गणपती बाप्पा हे १२ दिवस लवकर येणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील भगिनींचा गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित झाला आहे. गेले अकरा दिवस राज्यात उत्सवाचे वातावरण आहे. हा राज्यातील एक महत्त्वाचा आणि मोठा उत्सव आहे. बळीराजावरील अरिष्ट टळू दे, राज्यातील शेतकरी सुखी होऊ दे, राज्यातील जनता सुखी आणि समृद्ध होऊ दे, अशी प्रार्थना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणरायाला घातली आहे. तसेच, पुढच्या वर्षीदेखील ‘पुन्हा नवचैतन्य घेऊन, आमच्याकडे मुक्कामाला या,’ असे आवाहन करीत, राज्यात सुख-शांती नांदो अशी प्रार्थना सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने आपण करू या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -