आमदार नितेश राणेंचा सांगलीच्या निषेध सभेत सवाल
सांगली : यंदा गणेश विसर्जन मिरवणुकीवर देशभरात ११ ठिकाणी दगडफेक झाली. ही दगडफेक का आणि कशासाठी झाली? अशा प्रकारे दगडफेक कधी ईदच्या जुलूसावर झालेली दाखवावी. काल रात्री १२ वाजेपर्यंत जुलूसमध्ये डॉल्बी वाजत होते. जसा ईदच्या जुलूसाचा आदर होतो तसाच हिंदूंच्या सणांचा आदर का केला जात नाही, असा प्रश्न आमदार नितेश राणे यांनी केला आहे.
हिंदू देवताच्या अपमानाबद्दल सांगलीत काढण्यात आलेल्या निषेध सभेनंतर ते बोलत होते. रामगिरी महाराज हे पैगंबरांबद्दल काय चुकीचे बोलले, असा सवाल त्यांनी यावेळी केला. रामगिरी महाराजांना जीवे मारण्याची धमकी दिली जाते. झाकीर नाईक बोलला तर चालतो, १०० मौलवी बोलले तर चालते. पण एक हिंदू बोलला तर काहींना राग येतो, असे ही नितेश राणे म्हणाले. आता हिंदू महाराजांनी प्रवचने आणि भाषणे आधी मशिदीत पाठवायची का? हिंदू देवी देवतांचा अपमान आम्ही का सहन करायचा? असे प्रश्न त्यांनी विचारले.
हिंदूत्वाबाबत तडजोड होणार नाही
भाजपचे आमदार मुस्लिम विरोधी वक्तव्य करतात अशी तक्रार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. यावर बोलताना नितेश राणे म्हणाले, अजित दादांना कुठे तक्रार करायची असेल तर ते करू शकतात, तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे. हिंदुत्वाबद्दल आमच्याकडून कोणताही तडजोड होणार नाही.
वरिष्ठांशी बोलले तर ते जे सांगतील तसे काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहेत. पण हिंदुत्वावर तडजोड होणार नाही. मला अपेक्षा होती की जे आमची दिल्लीला तक्रार करतात त्यांनी गणपती विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक झाली त्याचा एकदा तरी निषेध करायला हवा होता. ते ज्या दिवशी निषेध, आक्षेप घेतली त्या दिवशी त्यांना तक्रार करण्याची वेळ येणार नाही.