ऋतुराज – ऋतुजा केळकर
परवाच ट्रेनमध्ये एक स्त्री मला बोलता बोलता म्हणाली, “डोंबिवली ते विरार रोजचा धकाधकीचा प्रवास करतानाही तुम्ही इतक्या टवटवीत आणि प्रसन्न अशा काय असता?”
खरंच आजच्या या समाजात सुखलोलुप झालेल्या या आयुष्यात सुखाचे, आनंदाचे अमृतकण शोधून ते प्राशन करून जीवन संग्रामात ते रुजवून जगणं खरंतर अशक्यप्राय आहे. तत्त्वतः दैनंदिन जीवनात सदैव प्रसन्न कसं राहायचं हा मोठा यक्षप्रश्न आहे. पण जे आहे जसं आहे ते तसंच्या तसं स्वीकारून त्यातूनच आपल्या मनात ममतेचा अमृत झरा वाहत ठेवला तरच स्थिर बुद्धीने जगणं सहज शक्य आहे.
मनासारख्या मुलीशी लग्न झालं नाही… मोठी प्रशस्त जागाच घेता आली नाही… घरापासून दूर कुठेतरी नोकरी करता जावं लागतं आहे… प्रवासातच आयुष्य निघून जातयं… बघीतले तर खूप दुःख, वेदना आहेत. आयुष्यात पण नाण्याला दुसरी ही बाजू असते ती पाहा…. माझं लग्न जिच्यासोबत झालयं ती घरच्यांच्या पसंतीची आहे, त्यामुळे तिने घरच्यांचा आणि घरच्यांनी तिचा उत्तम पद्धतीने स्वीकार केला आहे म्हणूनच आता प्रपंचातील भांडण, त्रास, कटकटी तरी होणार नाहीत म्हणजेच प्रपंच सुखकर होईल.
छोटंस का होईना पण स्वतःचं असं हक्काचं सुरेख घरकुल उभं राहिलं आहे. शिवाय घरं मुला माणसांनी गजबजलेलं आहे, नाही तर हजार दीड हजार स्क्वेअर फूटच्या अद्ययावत घरात राहायला कुणीच नाही. याला काय अर्थ आहे… नाही का? घरापासून दूर नोकरी असली म्हणून काय झालं… बेरोजगारीने आयुष्याचे चटके सोसत जगणाऱ्यांपेक्षा मला एक विशिष्ट रक्कम दर महिन्याला मिळतेय की, ज्यात मी माझी आणि माझ्या कुटुंबीयांची व्यवस्थित गुजराण करू शकतोय, शिवाय रात्री उशिराने का होईना पण मी माझ्या घरकुलाच्या उबेत परत येऊ शकतोय. त्यांच्या सुख दुःखात सामील होऊ शकतोय.
कसं आहे ना नेहमीच आपण जे नाही त्याचं दुःख करत राहातो आणि जे आहे त्याकडे आपलं लक्षच नसतं. “ग्लास अर्धा भरलेला आहे” त्यावर लक्ष द्या. पाहा आयुष्य सुखाच्या बकुळ फुलांनी कसं गंधीत होईल. हे जीवन गाणे अधिकाधिक सुरेल होईल. सुखाचे पैंजण आपल्या जीवन गीतात कायमचं वाजत असतात. पण आपण दुःखाच्या भैरवीचा स्वर इतका तार सप्तकात लावलेला असतो की, त्यांची मंजुळ रूणझुण आपल्याला ऐकायलाच येत नाही.
‘आता उरलो निम्मित्त मात्र’ असा विचार न करता आत्मानुभूतीचे आनंदाचे क्षण वेचून आपल्या हदयात सुखाची, समाधानाची ज्योत तेवत ठेऊन सकारात्मक विचारांची पेरणी केली की, नकारात्मक अंधकाराला मनातून हद्दपार व्हायला वेळ लागणार नाही. मग या ठिणगीची ज्योत आणि ज्योतीची ज्वाला व्हायला वेळ लागणार नाही. या एका छोट्याशा झुळुकीचं आपल्या आयुष्यात सुखसमृद्धीचं वादळ यायला वेळ लागणार नाही आणि मग काय…
‘ जिवन चलने का नाम
चलते रहो सुबह शाम”
या ऐवजी…
“आनंदाचे डोही आनंद तरंग
आनंदची अंग आनंदाचे…”
हे गीत कायमचे आपल्या ओठांवर विसावेल.