अमरावती : स्थिरावलेला झेंडूचा दर यंदा गणेश उत्सवामुळे तेजीत होता. पावसामुळे बहुतांशी फुलांची नासाडी झाली होती. त्यामुळे बाजारात फुलांची आवकही कमी होती. अशातच गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला फुलांच्या भावात घसरण झाली. त्यामुळे आता पितृपक्षात फुलांचा भाव स्थिरावणार असला तरीही दसऱ्याला फुलांचे भाव पुन्हा कडाडणार (Flowers Price Hike) असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मागील दोन महिने झालेल्या मुसळधार पावसाचा फटका फूलशेतीला बसला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी फूलशेती कोलमडली आहे. यामुळे फुलांची आवक कमी झाली असून सणासुदीचा काळ असल्यामुळे मागणी मोठ्या प्रमाणात दिसून येत होती. त्यामुळे सध्या फुलांना चांगले बाजारभाव मिळत आहे.
दरम्यान अमरावती तालुक्यांत अनेक शेतकरी जुलै ते सप्टेंबर या कालावधीत झेंडू, अस्टर, गुलछडी, जास्वंद, पांढरी शेवंती आदी फुलांचे भरघोस उत्पादन घेतात. मात्र, यावर्षी अनेक गावांत सतत झालेल्या मुसळधार पावसामुळे फुलांची रोपे व झाडे वाया गेली.परिणामतः मोठ्या प्रमाणात मागणी असूनही फुलांचा पुरवठा करता येत नाही, असे अकोळनेर (ता. नगर) येथील फूल उत्पादक शेतकरी तुषार मेहेत्रे यांनी सांगितले. पितृ पंधरवाड्यात झेंडूचे प्रति किलो भाव ३० ते ४० रुपये राहतील. मात्र, नवरात्रीत व दसरा, दिवाळीत फुलांच्या भावात पुन्हा वाढ होईल, असे व्यापाऱ्यांनी म्हटले.
फुलांचे दर असे (रुपये/किलो)
झेंडू – ३०
शेवंती – ८०
गुलाब – २००
गुलछडी – १६०