भिवंडी : संपूर्ण राज्यभरात गणेशोत्सव (Ganeshotsav) शांततेत पार पडत असताना भिवंडीत (Bhiwandi) रात्री साडे बारा वाजताच्या सुमारास धक्कादायक घटना घडली. भिवंडीमधील वंजार पट्टी नाका परिसरात गणेश विसर्जन (Ganesh Visarjan) मिरवणुकीमधील गणेश मूर्ती असलेली वाहन आल्या असता सुंदर बेणी कंपाऊंड घुंगट नगर येथील श्री हनुमान मित्र मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीवर अज्ञात व्यक्तीने दगडफेक केल्याची घटना घडली. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात मोठ्या तणाव निर्माण झाला. त्यानंतर गणेश भक्ताने रस्त्यातच बसून जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरल्या नंतर अनेक हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी काही जणांना जमावा कडून मारहाण झाल्याची घटना घडली.
दरम्यान, या घटनेनंतर तणाव आणखी वाढल्याने जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. यामध्ये काही नागरीक जखमी असून जमावा कडून झालेल्या दगड फेकीत एक पोलिस सुध्दा जखमी झाला आहे. यानंतर शहरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, अशी माहिती सह पोलिस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी दिली.