पुणे : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन करत गणेशोत्सवासाठी आवश्यक साऊंड सिस्टिमच्या नियमांचे पालन करून पुण्यातील गणेशोत्सव मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत रात्री बारा ते सकाळी सहा वाजेपर्यंत साऊंड सिस्टिम बंद ठेवली होती. सकाळी सहा वाजता अन्य रस्त्यांवरील साऊंड सिस्टिम सुरू करण्यात आली. मात्र पोलिसांनी टिळक रस्त्यावरील मंडळांना साऊंड सिस्टिम सुरू करण्यासाठी मज्जाव केला. त्यामुळे मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते चांगलेच संतापले. त्यांनी पुणे पोलीस विघ्नहर्ता न्यासच्या मंडपासमोरच ठिय्या आंदोलन केले. यावेळी पोलिसांच्या सामंजस्यामुळे मोठ्या तणावाची परिस्थिती टळली.
गणेशोत्सवात ध्वनी प्रदूषणासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या नियमांचे पालन करण्यासंदर्भात पोलिसांकडून गणेशोत्सव मंडळांना सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार मंगळवारी रात्री बारा वाजता विसर्जन मिरवणूक गणेशोत्सव मंडळांनी साऊंड सिस्टिम बंद केली. त्यानंतर बुधवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अन्य मंडळांनी रस्त्यांवरील साऊंड सिस्टिम सुरू केली.
मात्र टिळक रस्त्यावरील गणपती मंडळांना साऊंड सिस्टिम सुरू करण्यासंदर्भात पोलिसांनी मज्जाव केला. कार्यकर्त्यांनी विनंती करूनही पोलिसांनी कार्यकर्त्यांचे ऐकले नाही. या प्रकारामुळे गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते चांगलेच संतापले. दरम्यान स. प. महाविद्यालयाजवळ असलेल्या पुणे पोलीस विघ्नहर्ता न्यासच्या मंडपासमोर मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले.
दरम्यान, पुणे पोलीस विघ्नहर्ता न्यासचे समन्वयक प्रवीण चोरबेले, सालेम खान यांनी मंडळांना शांत करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्यात आला. चोरबेले व न्यासाचे विश्वस्त डॉ. मिलिंद भोई यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीण पाटील यांच्याशी संपर्क साधला. पाटील यांनी गणेश मंडळांशी संवाद साधत त्यांची समजूत काढून त्यांना शांत केले. त्यानंतर साऊंड सिस्टिमवर गणपतीची आरती लावून विसर्जन मिरवणूकीला पुन्हा जल्लोषात सुरुवात झाली, अशी माहिती पुणे विघ्नहर्ता न्यास विश्वस्त डॉ. मिलिंद भोई यांनी दिली.
या आंदोलनात वीर सावरकर मित्र मंडळ (राजेंद्र नगर), गणपती नगर मित्र मंडळ (गणेश मळा), आणि श्रीमंत जय भवानी मंडळ (राष्ट्र भूषण क्रीडा संघ) यांचा सहभाग होता. पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे मोठ्या तणावाची परिस्थिती टाळली गेली आणि उत्सव पुन्हा जल्लोषात सुरू झाला.