मुंबई : रायगडच्या पाली-खोपोली महामार्गावर आज भीषण अपघात घडला. यात दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. कानसळ गावाजवळ स्कूल बसने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली.
पाली-खोपोली महामार्गावर सलग दुसऱ्या दिवशी घडलेला हा मोठा अपघात आहे. कालही या महामार्गावर एसटी बस आणि बोलेरो कारचा भीषण अपघात झाला होता. यामध्ये कारचे मोठे नुकसान झाले तर बस पलटी झाली होती. त्यातून ४८ एनसीसी विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले होते.
दुसरीकडे, नांदेडच्या कंधार-जळकोट राष्ट्रीय महामार्गावर फॉर्च्यूनर कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन दोन जणांचा मृत्यू झाला. कंधार तालुक्यातील दत्तात्रेय मांनस्पुरे आणि शेख मगदुम यांचा जागीच मृत्यू झाला. फॉर्च्यूनर कारमधील एक व्यक्ती जखमी झाला आहे.
दरम्यान, सोलापूरच्या माढा परिसरात बार्शी-माढा एसटी बसचा ब्रेक फेल झाला होता. मात्र चालक केदारे बाबुराव नरवडे यांच्या सतर्कतेमुळे बस मुरुमाच्या ढिगाऱ्यावर नेऊन थांबवली गेली. त्यामुळे अपघात टळला आणि ३० प्रवाशांचा जीव वाचला.