मुंबई : ‘ही शान कोणाची, लालबागच्या राजा’ची अशा निनादात काल सकाळी मंडपाबाहेर पडलेला लालबागचा राजाचं (Lalbaugcha Raja Visarjan 2024) अखेर २३ तासांनी विसर्जन झालं आहे. गिरगाव चौपाटीवर महाआरती करून बाप्पाला गणेशभक्तांनी निरोप दिला. यावेळी गिरगाव चौपाटी गणेशभक्तांनी फुलून गेली होती.
दहा दिवस बाप्पाची भक्तीभावाने सेवा केल्यानंतर १७ सप्टेंबर रोजी मोठ्या थाटामाटात मुंबई पुण्यासह सर्व भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे गणपती बाहेर पडले. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत बाप्पाच्या विसर्जनासाठी असंख्य भक्त रस्त्यावर उतरले होते. मुंबई लालबाग परिसरातील केंद्रबिंदू मानला जाणाऱ्या लालबागच्या राजामुळे लालबाग, परळ, भायखळासह गिरगाव चौपाटीच्या दिशेकडचे सर्व रस्ते खुलून गेले होते.
असं झालं राजाचं विसर्जन
राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाल्यानंतर ठिकठिकाणी बाप्पावर पुष्पवृष्टी करण्यात आली. रात्रभर मुंबईच्या रस्त्यांवर गणेशभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. आज सकाळी लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल झाल्यानंतर बाप्पाची दिमाखात महाआरती करण्यात आली. त्यानंतर राजाला विसर्जनाच्या दिशेकडे नेण्यात आले आणि राजाला तराफ्यावर बसवण्यात आले. यावेळी कोळी बांधवांकडून लालबागच्या राजाला बोटींची सलामी देण्यात आली. समुद्राच्या मध्यभागी तरफा थांबवण्यात आला. अत्याधुनिक तराफ्यातून राजाची मूर्ती खोल समुद्रात विसर्जित करण्यात आली. यावेळी प्रत्येक भाविकाचे डोळे पाणावले होते.