लेबनॉन : लेबनॉनमध्ये साखळी बॉम्बस्फोटांमध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला आणि २८०० च्या आसपास जखमी झाले आहेत. या घटनेत हिजबुल्लाहचे सैनिक, आरोग्य कर्मचारी, आणि इराणचे राजदूत मोजतबा अमानी जखमी झाले आहेत. स्फोट इस्रायल आणि हिजबुल्लाहमधील दीर्घकाळ चाललेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर घडल्याचं मानलं जात आहे.
लेबनॉनच्या काही भागांत एकाचवेळी शेकडो हॅन्डहेल्ड पेजरचा स्फोट झाला. हिजबुल्लाहच्या एका अधिकाऱ्याने हा हल्ला सुरक्षेतील मोठी त्रुटी असल्याचं म्हटलं आहे. या स्फोटांमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली असून, हिजबुल्लाहने जारी केलेल्या निवेदनात या स्फोटांच्या कारणांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं आहे. त्यांनी नागरिकांना अफवांपासून दूर राहण्याचं आवाहन केलं आहे.
व्हायरल व्हिडिओंमध्ये किराणा दुकानं आणि बाजारपेठांमध्ये हातातील उपकरणे फुटताना दिसत आहेत, ज्यात अनेक लोक जखमी झाले. आरोग्य मंत्रालयाने सर्व डॉक्टरांना रुग्णालयात येऊन जखमींना तातडीने मदत करण्याचं आवाहन केलं आहे. जखमींना चेहरा, डोळे, आणि इतर शारीरिक भागांवर गंभीर जखमा झाल्या आहेत.
या घटनेनंतर हिजबुल्लाहने स्मार्टफोन वापरणं टाळण्याचा सल्ला दिला आहे.