जम्मू : जम्मू-काश्मीर विधानसभेच्या २४ जागांसाठी आज, बुधवारी १८ सप्टेंबर रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान झाले. यात संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ५८.८५ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. पहिल्या टप्प्यात किश्तवाड येथे सर्वाधिक ७७.२३ आणि पुलवामा येथे सर्वात कमी ४६.०३ टक्के मतदान झाले.
राज्यातील विधानसभेच्या २४ जागांवर मतदान झाले. यात ९० अपक्षांसह २१९ उमेदवार मैदानात असून २३ लाखांहून अधिक मतदात्यांनी या उमेदवारांच्या भाग्याचा फैसला इव्हीएममध्ये नोंदवला. जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका होत आहेत.
राज्यात संध्याकाळी ६ वाजेपर्यंत अनंतनाग जिल्ह्यातील ७ जागांवर ५४.१७ टक्के, डोडा जिल्ह्यामधील ३ जागांवर ६९.३३ टक्के, किश्तवाडच्या ३ जागांवर ७७.२३ टक्के, कुलगामच्या ३ जागांवर ६१.५७ टक्के, पुलवामा येथील ४ जागांवर ४६.०३ टक्के, रामबन येथील २ जागांवर ६७,७१ टक्के आणि शोपियां जिल्ह्यामधील २ जागांवर ५३,६४ टक्के मतदान झाले. राज्यातील २४ जागांवर पहिल्या टप्प्यात एकूण ५८.८५ टक्के मतदान झाले.