Sunday, October 6, 2024
Homeताज्या घडामोडीVisarjan Miravnuk 2024 : बाप्पांच्या विसर्जनासाठी दुमदुमली नगरी..

Visarjan Miravnuk 2024 : बाप्पांच्या विसर्जनासाठी दुमदुमली नगरी..

बाप्पा निघाले गावाला.. चैन पडेना आम्हाला… गणपती बाप्पा मोरया’, ‘पुढच्या वर्षी लवकर या…

मुंबई : मागील १० दिवसांपासून बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर गणरायाचे ज्या जल्लोशात आगमन झाले, त्याच उत्साहात आज बाप्पाला निरोप देण्याची (Anant Chaturdashi) तयारी मंडळांकडून झाली आहे. ‘बाप्पा निघाले गावाला.. चैन पडेना आम्हाला… गणपती बाप्पा मोरया’, ‘पुढच्या वर्षी लवकर या’ अशा जयघोषात लाडक्या बाप्पाला आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात येणार आहे.

मुंबईत लालबागचा राजा, गणेशगल्लीचा राजा, चिंतामणीसह सार्वजनिक आणि घरगुती गणरायांचे विसर्जन, घरगुती गणपतींनाही निरोप (Ganesh Visarjan) दिला जाणार आहे.

पारंपरिक वेशभूषेसह नाशिक ढोल, पुणेरी ढोल, लेझीम पथक आदींचे नियोजन, लगबग अनेक मंडळांकडून सुरू आहे. दरम्यान, अनेक मोठ्या शहरांत गणेश विसर्जन मिरवणुकीत महिलांची छेडछाड होऊ नये गृह खात्याने साध्या वेशातील पोलीस उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. गणेश विसर्जन मिरवणूक कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पडावी म्हणून हजारोंच्या संख्येने पोलीस आणि हजारो सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे.

‘निरोप घेतो देवा, आता आज्ञा असावी…’

लालबागच्या राजाची शेवटची आरती झाली. बाप्पाच्या आरतीवेळी मंडप परिसरात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. यावेळी मंडपातील आरती सुरु असताना कार्यकर्ते भावूक झाल्याचे दिसून आले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

अनंत चतुर्दशीला मुंबईत गणेशभक्तांची गर्दी

आपल्या याच लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईत गणेशभक्तांची हमखास गर्दी पाहायला मिळणार आहे. ज्यांना लांबच्या लांब रांगा लावून मंडपात बाप्पाचे दर्शन घेणे शक्य होत नाही ते हमखास गिरगांव चौपाटी, दादर चौपाटी अशा ठिकाणी बाप्पाच्या अखेरच्या दर्शनाकरता जातात. हीच बाब लक्षात घेऊन मुंबई पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील अनेक महत्त्वाचे रस्ते बंद ठेवण्यात येणार आहेत. शिवाय मुंबई पोलिसांच्या रजा रद्द करण्यात आल्या असून त्यांना २४ तासांच्या कडक पहा-यासाठी ऑन ड्युटी राहावे लागणार आहे.

याचबरोबर कोणत्याही प्रकारची वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पोलीस विभागाकडून मोठ्या शहरांमध्ये गणेश विसर्जनाच्या दिवशी शहरात सर्व प्रकारच्या अवजड वाहणांना प्रवेश बंदी घातली आहे.

लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणजेच, गणेशगल्लीचा गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे. अकरा दिवस अथोचित पाहुणचार घेतल्यानंतर मुंबईचा राजाची विसर्जन मिरवणूक थाटामाटात सुरू झाली आहे. सर्वात आधी मुंबईच्या राजाची आरती पार पडली, त्यानंतर मुंबईच्या राजाचा जयघोष करण्यात आला. गुलालाची उधळण, गणपती बाप्पा मोरया, २२ फुटी वाले की जयच्या जयघोषात सर्वांचा लाडका विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे.

मुंबईचा राजा आपल्या दरबारातून निघाला असून संपूर्ण लालबाग नगरीला एक प्रदक्षिणा घालून त्यानंतर विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीच्या दिशेनं मार्गस्थ होणार आहे. मोठ्या संख्येने भाविक मुंबईच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले असून ढोल-ताशांच्या तालावर ठेका धरला आहे.

गुलालाची उधळण करत, ढोल-ताशांच्या गजरात गणेशगल्लीकर आपल्या लाडक्या मुंबईच्या राजाला निरोप देण्यासाठी विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले आहेत.

पाठोपाठ लालबागचा राजाची विसर्जन मिरवणूकही थाटामाटात सुरू झाली आहे. संपूर्ण लालबागमध्ये अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी, फुलांचा वर्षाव करण्यासाठी गणेशभक्त सज्ज आहेत. लालबागचा राजा मंडळाच्या मेन गेटवर गणेशभक्तांची प्रचंड गर्दी झाली. यावेळी पोलिसांना पुढे यावे लागले व गर्दी बाजूला करावी लागली.

अकरा दिवस आपल्याकडे पाहुणचार घेणा-या लाडक्या बाप्पाला गणेशभक्त साश्रू नयनांनी निरोप देत असल्याचे दृश्य सगळीकडे पाहायला मिळत आहे.

विसर्जनावर ड्रोन, सीसीटीव्हीची नजर

अनंत चतुर्थीला होणारे सार्वजनिक गणेश मूर्तीचे विसर्जन आणि बुधवारी (ता. १८) आलेला ईद ए मिलाद सण निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी मुंबई पोलीस सज्ज असल्याची ग्वाही सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी दिली आहे. पुरेपूर मनुष्यबळासह ड्रोन आणि कॅमे-यांच्या मदतीने शहरातील प्रमुख विसर्जन स्थळे, महत्त्वाच्या गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकांमधील प्रत्येक हालचालींवर करडी नजर ठेवली जाणार असल्याचे चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबईतील गर्दीत होणा-या चो-यामा-या, हाणामारी असले प्रकार टाळण्यासाठी मुंबई महापालिका, पोलीस, वाहतूक शाखा यासह विविध सरकारी यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. विसर्जनाच्या दिवशी मुंबई शहर आणि उपनगरातील महत्त्वाचे रस्ते बंद राहणार आहेत. तसेच अनंत चतुर्दशीनिमित्त मुंबईतील पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या वैद्यकीय रजा वगळता इतर सगळ्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत. चौपाट्या, तलाव या ठिकाणी पालिकेने विसर्जनाची चोख तयारी ठेवली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -