सौर, पवन आणि ग्रीन हायड्रोजनसारख्या अक्षय ऊर्जा प्रकल्पांमध्ये मोठी गुंतवणूक
मुंबई : गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूहाने ४.०५ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह ७१,१०० लोकांना रोजगार देण्याची योजना जाहीर केली आहे. चौथ्या ग्लोबल रिन्युएबल एनर्जी इन्व्हेस्टर्स मीट अँड एक्स्पो (री-इन्व्हेस्ट) २०२४ दरम्यान, अदानी समूहाने सौर, पवन आणि ग्रीन हायड्रोजनसारख्या अक्षय ऊर्जा प्रकल्पांमध्ये मोठी गुंतवणूक करण्याचे वचन दिले आहे.
अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड (AGEL) आणि अदानी न्यू इंडस्ट्रीज लिमिटेड (ANIL) या दोन प्रमुख कंपन्या या प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करतील. AGEL ही सध्या भारतातील सर्वात मोठी अक्षय ऊर्जा कंपनी असून २०३० पर्यंत ५० गिगावॅट (GW) अक्षय ऊर्जा उत्पादन क्षमतेचे लक्ष्य ठेवले आहे. सध्या ११.२ GW क्षमतेचे प्रकल्प चालू अवस्थेत आहेत.
अदानी न्यू इंडस्ट्रीज लिमिटेडने १० GW क्षमतेचा सोलर मॅन्युफॅक्चरिंग प्लांट, ५ GW क्षमतेचा पवन ऊर्जा प्रकल्प, तसेच १० GW क्षमतेचा ग्रीन हायड्रोजन उत्पादन प्रकल्प उभारण्याचे योजले आहे. या प्रकल्पांतून दरवर्षी ०.५ मिलियन टन ग्रीन हायड्रोजन आणि २.८ मिलियन टन ग्रीन अमोनिया उत्पादित केले जाईल. याशिवाय ६ GW क्षमतेचे इलेक्ट्रोलायझर उत्पादन देखील करण्यात येणार आहे.
या महत्त्वाकांक्षी गुंतवणुकीतून सुमारे ७१,१०० लोकांना रोजगार मिळण्याची अपेक्षा आहे. यामुळे अक्षय ऊर्जा क्षेत्रात भारताला जागतिक स्तरावर आणखी मजबुती मिळेल, तसेच ग्रीन हायड्रोजन आणि स्वच्छ ऊर्जा उत्पादनाच्या क्षेत्रात भारताचे नेतृत्व दृढ होईल.