Monday, October 7, 2024
Homeताज्या घडामोडीराज्यघटनेबाबत जागृतीसाठी संविधान मंदिर प्रेरणादायी – उपराष्ट्रपती जगदीप धनखड

राज्यघटनेबाबत जागृतीसाठी संविधान मंदिर प्रेरणादायी – उपराष्ट्रपती जगदीप धनखड

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असून भारतीय राज्यघटना ही सर्वार्थाने वैशिष्ट्यपूर्ण आहे. भारतीय राज्यघटनेबाबत नवीन पिढीत जागृतीसाठी संविधान मंदिर नक्कीच प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले.

एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे कौशल्य विकास विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय अंतर्गत ४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ‘संविधान मंदिर लोकार्पण सोहळा झाला. यावेळी उपराष्ट्रपती यांच्या पत्नी डॉ. सुदेश धनखड, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन नागपूर येथून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (ई- उपस्थित), कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, कौशल्य विकास विभागाचे सचिव गणेश पाटील, विकास आयुक्त प्रदिपकुमार डांगे, कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सूर्यवंशी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. मान्यवरांनी संविधान संग्रहालयाचीही पाहणी केली.

उपराष्ट्रपती श्री. धनखड म्हणाले की, भारतीय संस्कृतीचे सार आपल्या संविधानात सामावले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान निर्मितीमध्ये खूप मोठे योगदान आहे. भारतीय राज्यघटना सर्वार्थाने वैशिष्ट्यपूर्ण असून राज्यघटनेचा गाभा आपण समजून घेणे गरजेचे आहे. वंचितांच्या विकासासाठी डॉ. आंबेडकर यांनी आयुष्यभर परिश्रम घेतले. सामाजिक न्याय हा आरक्षणाचा आधार असून वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्यावर भर देणे गरजेचे आहे. डॉ. आंबेडकर यांचे योगदान नव्या पिढीला समजणे गरजेचे असून त्यादृष्टीने संविधान मंदिर उपक्रम अतिशय उपयुक्त ठरेल. जागतिक लोकशाही दिवस सर्वत्र साजरा होत असताना आपल्याला अभिमान आहे की भारत हा सर्वात मोठा लोकशाही असलेला देश असून जो विविधतेतही एकता जपून आहे. याचे सर्व श्रेय आपल्या संविधानाला जाते. भारतीय हीच आपली पहिली ओळख असून राज्यघटनेप्रती आपण सदैव आदर बाळगणे गरजेचे आहे. या संविधानाचे महत्व नव्या पिढीला समजावे यासाठी असे उपक्रम खूप गरजेचे आहेत असेही उपराष्ट्रपती श्री. धनखड यांनी सांगितले.

राज्यात ४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ‘संविधान मंदिर लोकार्पण हा उपक्रम स्तुत्य असल्याचे श्री. धनखड यांनी सांगितले.

कौशल्य विकास विभागाचे नाविन्यपूर्ण उपक्रम: राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन म्हणाले की, आपल्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १९०४ ते १९०७ या काळात जेथे शिक्षण झाले त्याठिकाणी आपण उभे आहोत याचा अभिमान वाटतो. एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूल ही पहिली शाळा आहे ज्या शाळेने देशातील आजच्या कौशल्य विकास विभागाचा पाया घातला. राज्यात सुरु असलेली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, रोजगार मेळाव्याचे आयोजन यासारख्या अनेक नाविन्यपूर्ण योजना कौशल्य विकास विभागाने सुरू केल्या आहेत ज्यामुळे बेरोजगारी कमी होण्यास मदत होत आहे.

महाराष्ट्रातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये संविधान मंदिरे स्थापन केली जात आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या संविधानाची निर्मिती व त्या अनुषंगाने सर्व माहिती समजून घ्यावी. कौशल्य विकासावर लक्ष केंद्रित करून विद्यार्थ्यांना २१ व्या शतकासाठी तयार करणे, शिक्षण पद्धतीत परिवर्तन घडवून आणण्याचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट आहे.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी राष्ट्रनिर्माणाचा हा उपक्रम हाती घेतल्याबद्दल कौशल्य विकास विभाग आणि कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे त्यांनी अभिनंदन केले.

आपले संविधान सर्वधर्मसमभावाचे प्रतिक: केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले

केंद्रीय राज्यमंत्री श्री. आठवले म्हणाले की, राज्याच्या विकासामध्ये कौशल्य विकास विभागाचे मोठे योगदान आहे. राज्यात औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ‘संविधान मंदिर लोकार्पण होत आहे याचा अभिमान आहे. सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहनही मंत्री श्री. आठवले यांनी केले.

भारताचे संविधान सर्वांसाठी मार्गदर्शक : कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

मंत्री श्री. लोढा म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य विकास विभाग गतीने काम करत आहे.

जागतिक लोकशाही दिनाचे औचित्य साधून कौशल्य विकास विभागांतर्गत ४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ‘संविधान मंदिर लोकार्पण होत आहे याचा अत्यंत आनंद आहे. आपले संविधान आणि त्याचे महत्त्व तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार संविधान मंदिराच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पोहोचतील.

यावेळी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांच्या डॉ. भदंत राहुल बोधी (महाथेरो), भदंत बोधिशील स्थंविर, राजकुमार त्रिमुखे, बाळू अहिरे, हनुमंत लोंढे यांचा सत्कार करण्यात आला.

उपराष्ट्रपतींचे मुंबई येथून प्रयाण

उपराष्ट्रपती श्री. धनखड यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून भारतीय वायू सेनेच्या विमानाने दुपारी १.०५ वाजता पुढील नियोजित कार्यक्रमासाठी नागपूरकडे प्रयाण झाले. यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पुष्पगुच्छ देऊन निरोप दिला. यावेळी अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, ॲडमिरल अनिल जग्गी, अतिरिक्त पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता तसेच राजशिष्टाचार विभाग व पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जव्हार येथे प्राचार्य श्याम अंबाळकर यांच्या संकल्पनेतून कार्यक्रम संपन्न

जागतिक संविधान दिनाचे औचित्य साधुन याच कार्यक्रमासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था जव्हार येथे प्राचार्य श्याम अंबाळकर यांच्या कुशल संकल्पनेतून कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख उद्घाटक पंचायत समिती जव्हार सभापती विजया लहारे व इतर मान्यरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनानंतर संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.

यानंतरच्या छोटेखानी कार्यक्रमासाठी दिपक टिके, सहाय्यक प्रकल्प अधिकारी जव्हार, विलास साबळे, बार्टी पुणे, केशव गावंढा प्राचार्य जय पॅरामेडिकल जव्हार, कांचनमाला चुंबळे माजी नगराध्यक्ष जव्हार. प्रकाश चुंबळे, दयानंद लहारे, जव्हार तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सदीप साळवे, सचिव मनोज कामडी, दिपक भिसे, अतिक कोतवाल, लिपिक नरेश पाटील, प्रकल्प ऑफिस जव्हार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी प्राचार्य श्याम अंबाळकर यांनी प्रास्ताविक केले व नंतर भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये विस्तृतपणे विशद केली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात विजया लहारे यांनी संविधाना मुळेच माझ्या सारखी सामान्य महिला पंचायत समिती सभापती पदावर बसु शकली. तसेच असे संविधान विचारमंच स्थापन व्हायला हवेत आणि विद्यार्थ्यांनी त्याचे वाचन करायला हवे. त्याचबरोबर परीसरात तरुणांची व्यसनाधीनता, अपघात व आत्महत्या याबाबत चिंता व्यक्त केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -