मुंबई : राज्यातील प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी २५ सप्टेंबर रोजी मोठ्या आंदोलनाची (Teachers strike) घोषणा केल्यामुळे सर्व शाळा बंद राहणार आहेत. शिक्षक सरकारच्या शैक्षणिक धोरणाविरोधात एकत्र आले आहेत, शाळांच्या पटसंख्येच्या आधारे शिक्षक नेमणुकीतील बदल आणि सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती यांचा त्यांनी विरोध केला आहे.
शिक्षणाची गुणवत्ता कमी होण्याची भीती
शिक्षक संघटनांचा आरोप आहे की सरकारच्या नवीन धोरणांमुळे ग्रामीण भागातील शाळांचा दर्जा घसरू शकतो. २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये एकच शिक्षक असणार, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होईल. शिवाय, कंत्राटी शिक्षण पद्धतीमुळे शिक्षणाची गुणवत्ता कमी होण्याची भीती शिक्षकांनी व्यक्त केली आहे.
१ लाख ८५ हजार ग्रामीण विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात
या धोरणांमुळे जवळपास १ लाख ८५ हजार ग्रामीण विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येऊ शकते, तसेच २९ हजारांपेक्षा जास्त शिक्षकांवर परिणाम होऊ शकतो. शिक्षक संघटनांनी सरकारकडे हे नियम रद्द करण्याची मागणी केली आहे, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी आंदोलनाचा निर्णय घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर मोर्चे काढणार
२५ सप्टेंबर रोजी शिक्षक राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर मोर्चे काढणार असून, शिक्षण व्यवस्थेतील या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधणार आहेत. सामूहिक रजा आंदोलनाच्या घोषणेने विद्यार्थ्यांसाठी हा एक गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शिक्षकांचे हे आंदोलन शिक्षण व्यवस्थेतील अन्यायकारक धोरणांविरोधात आहे आणि समाजातील सर्व घटकांनी या विषयाचे गांभीर्य ओळखले पाहिजे.