सिंधुदुर्ग : ब्लॅकमेलिंग मध्ये ज्यांनी पीएचडी केलेली आहे व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात कुठलाही राजकीय पक्ष ज्याला प्रवेश द्यायला तयार नाही असे परशुराम उपरकर, भाजपचे कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण व त्यांचे सहकारी अनिकेत पटवर्धन यांच्यावर जेव्हा बेछूट आरोप करतात, तेव्हा कोण आरोप करतो, यावर देखील सिंधुदुर्गची जनता विचार करेल. ज्यांनी पूर्ण आयुष्य हे टक्केवारी व ब्लॅकमेल मध्ये काढले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विषयी जी व्यक्ती घाणेरडे राजकारण करू पाहत आहे, आपले खिसे भरण्याचा प्रयत्न करत आहे, आपले स्वतःचे हिशोब चुकते करण्याचा प्रयत्न करत आहे, हे भाजपाचा कोणताही कार्यकर्ता खपवून घेणार नाही, असा इशारा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उपरकर यांना दिला आहे.
आमदार नितेश राणे म्हणाले, रवींद्र चव्हाण, अनिकेत पटवर्धन व त्यांचे सहकारी यांनी जिल्ह्याच्या विकासाला दिलेले योगदान व पालकमंत्री म्हणून केलेले काम हे कुणालाही नाकारता येणार नाही. रवींद्र चव्हाण यांच्या कामाचे जर तुम्हाला कौतुक करायला जमत नसेल तर निदान असे घाणेरडे राजकारण देखील करू नका. सार्वजनिक बांधकाम विभागावर बेछूट आरोप करायचे व स्वतःचे घर चालते का पाहायचे आणि ते जमत नसल्याने पीडब्ल्यूडीचे अधिकारी व अनिकेत पटवर्धन, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर घाणेरडे आरोप करायचे व माझ्या चार बातम्या छापून येतात का? हे पाहायचे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात मी जिवंत आहे हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न उपरकर करत असल्याचा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला. राजकारणात ज्यांची पत शून्य आहे. मनसेमधून ज्यांना हाकलवून काढले, ठाकरे सेनेमध्ये त्यांना घ्यायला कुणी तयार नाही. एकनाथ शिंदेंच्या पायावर लोटांगण घातले तरीही यांना प्रवेश दिला नाही. अजित पवारांकडे नाक घासत गेले तरीही त्यांना प्रवेश दिला गेला नाही. भाजपामध्ये उपरकर यांना पक्षाचे दरवाजे बंद आहेत. येथे देखील त्यांनी भाजपामध्ये येण्यासाठी प्रवेश प्रयत्न केला होता. अशा व्यक्तीला किती महत्त्व द्यायचे व जनतेने यांना किती गांभीर्याने घ्यायचे याचा विचार करण्याची गरज आहे. त्यामुळे यापुढे जर उगाच रवींद्र चव्हाण, अनिकेत पटवर्धन यांच्यावर बेछूट आरोप केले गेले तर तुमच्या देखील कुंडल्या आम्हाला काढाव्या लागतील, असा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वातावरण तुम्ही तुमचा वैयक्तिक हिशोब चुकता करण्यासाठी खराब करत असाल तर आम्ही ते खपवून घेणार नाही. जिल्ह्याच्या विकासात ज्यांचे एक टक्का देखील योगदान नाही, त्यांनी रवींद्र चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांवर टीका करू नये. अन्यथा तुम्ही ज्याप्रमाणे पत्रकार परिषद घेत माहिती देता त्याचप्रमाणे आम्हाला देखील तुमच्याबद्दल भरपूर माहिती आहे ती पत्रकार परिषद घेत माहिती समोर आणावी लागेल. आम्ही सुद्धा आमचे तोंड उघडू शकतो. पण कुणाला किती महत्त्व द्यायचे हे चांगलं माहिती असल्यामुळे आम्हाला कुणाचे नाव घेऊन कुणाला मोठा करायचे नाही, असा टोला आमदार नितेश राणे यांनी लगावला.