१०० दिवसांमध्ये केलेल्या कामांची पंतप्रधान मोदींनी दिली माहिती
अहमदाबाद : अनेकांनी माझी खिल्ली उडवली, पण मी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भूमीत जन्मलेला मुलगा आहे. गप्प राहून देशहिताची धोरणे बनवण्यात मग्न होते. मी भाग्यवान आहे की तुम्ही मला आशीर्वाद देण्यासाठी इतक्या मोठ्या संख्येने आलात. तुमच्या अपेक्षांचीही मला जाणीव आहे. तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर मी लवकरात लवकर तुमच्यामध्ये यावे अशी तुमची इच्छा होती. देशातील जनतेने नवा इतिहास रचला आहे. एका सरकारला सलग तिसऱ्यांदा देशसेवेची संधी मिळाली असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) म्हणाले.
गुजरात दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान मोदी यांनी अहमदाबादच्या मैदानावर आयोजित केलेल्या भव्य स्वागत समारंभाला हजेरी लावली. येथे ते म्हणाले की, तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर मी पहिल्यांदाच गुजरातमध्ये आलो आहे. तुम्ही लोकांनी माझ्यावर सतत प्रेमाचा वर्षाव केला आहे. मुलगा घरी येऊन आशीर्वाद घेतो तेव्हा उत्साह अनेक पटींनी वाढतो.
१५ लाख कोटी रुपयांचे प्रकल्प १०० दिवसांत सुरू झाले
लोक मोदींबद्दल सर्व प्रकारचे बोलत राहिले. मी पण ठरवले होते की, तुम्हाला पाहिजे तेवढी मजा करा, मी एक शब्दही बोलणार नाही. प्रत्येक अपमान सहन करून मी धोरणे बनवण्यात आणि देशातील जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यात व्यस्त राहिलो. देशाच्या कल्याणासाठी जो मार्ग मला अवलंबायचा आहे, त्यापासून मी हटणार नाही, असे मी ठरवले होते. आज आम्ही आनंदी आहोत की हे सर्व अपमान दूर करून, या १०० दिवसांत समाजातील प्रत्येक घटकाच्या कल्याणाची हमी दिली गेली आहे. या १०० दिवसांत १५ लाख कोटींहून अधिक किमतीच्या अनेक प्रकल्पांवर काम सुरू झाले आहे. यात पायाभूत सुविधांचा विकास, आरोग्य सेवा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, ऊर्जा, सुरक्षा, रस्ते, रेल्वे, बंदरे इत्यादींवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. निवडणुकीच्या वेळी मी ३ कोटी घरे बांधण्याची हमी दिली होती. त्यांचे कामही सुरू झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळाचे १०० दिवस पूर्ण झाले आहेत.
कोल्हापूर- पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा शुभारंभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी ६ वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वेंना हिरवा झेंडा दाखवला. यात नागपूर ते सिकंदराबाद, कोल्हापूर ते पुणे, आग्रा कँट ते बनारस, दुर्ग ते विशाखापट्टणम, पुणे ते हुबळी आणि वाराणसी ते दिल्ली पहिल्या २० डब्यांच्या वंदे भारत रेल्वेचा त्यात समावेश आहे. पंतप्रधान मोदींनी भूज ते अहमदाबाद पहिल्या वंदे मेट्रोलाही हिरवा झेंडा दाखवला.
कोल्हापूर- पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा यावेळी शुभारंभ झाला. सव्वाचार वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधून ऑनलाईन पद्धतीने तर रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा प्रत्यक्ष उपस्थित राहून कोल्हापूर स्थानकातून या गाडीला हिरवा झेंडा दाखवला. कोल्हापूर – पुणे वंदे भारत आठवड्यातून दर सोमवार, गुरुवार आणि शनिवारी तर पुणे-कोल्हापूर या मार्गावर दर बुधवार, शुक्रवार आणि रविवारी धावणार आहे. याचवेळी कोल्हापूर स्थानकावरही रेल्वे राज्यमंत्री सोमण्णा यांनी झेंडा दाखवला. यावेळी खासदार शाहू महाराज, खासदार धनंजय महाडिक यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित होते. कोल्हापूर-पुणे वंदे भारत सकाळी ८ वाजून १५ मिनिटांनी सुटणार आहे. याचवेळी कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेसही सुटते. या दोन्ही गाड्यांची सुटण्याची वेळ आता एकच होणार आहे. यामुळे कोयना एक्स्प्रेसची सुटण्याची वेळ दहा ते पंधरा मिनिटांनी वाढवण्यात येणार आहे. याचा प्रवाशांना फायदा होणार आहे. कोयना एक्स्प्रेसची वेळ वाढवली तरी मिरजेपासून पुढील वेळापत्रकावर परिणाम होणार नाही, प्रवासाचा कालावधी तोच राहील, या द़ृष्टीने कोल्हापूर-मिरज मार्गावर गाडीचा वेग किंचित वाढवला जाण्याची शक्यता आहे.
अहमदाबाद-भुज दरम्यान नमो भारत रॅपिड रेल्वे सुरू झाली. या ट्रेनचा फायदा मध्यमवर्गीय लोकांना होणार आहे. नमो भारत रॅपिड रेल आगामी काळात देशातील अनेक शहरांना जोडणार आहे. नवी नमो भारत रॅपिड रेल्वे देशातील १५ हून अधिक मार्गांवर सुरू होणार आहे. आज १२५ हून अधिक वंदे भारत गाड्या देशातील लोकांना सेवा देत आहेत. हा भारताचा सुवर्णकाळ आहे. येत्या २५ वर्षात देशाचा विकास करायचा आहे.
उद्घाटनापूर्वी ट्रेनचे नाव बदलले
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील पहिल्या वंदे मेट्रो ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. त्याआधी रेल्वेने आज मोठा निर्णय घेतला आहे. वंदे मेट्रोचे नामकरण नमो भारत रॅपिड रेल असे करण्यात आले आहे. देशातील पहिली नमो भारत रॅपिड रेल्वे भुज ते अहमदाबाद दरम्यान धावणार आहे. ही ट्रेन तिच्या नियमित कामकाजादरम्यान अहमदाबाद आणि भुज दरम्यान साबरमती, चांदलोडिया, सानंद, विरमगाम, समखियाली, गांधीधाम यासह १२ स्थानकांवर थांबण्याची शक्यता आहे. मात्र, येत्या एक-दोन दिवसांत ट्रेनच्या थांब्यांसह वेळापत्रकाबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.