Sunday, October 6, 2024
HomeदेशPM Modi : भारत २१व्या शतकातील सर्वोत्तम दावेदार असल्याचा संपूर्ण जगाचा विश्वास...

PM Modi : भारत २१व्या शतकातील सर्वोत्तम दावेदार असल्याचा संपूर्ण जगाचा विश्वास – पंतप्रधान

गांधीनगर : भारत २१व्या शतकातील सर्वोत्तम दावेदार आहे, असा फक्त भारताचाच नाही, तर संपूर्ण जगाचा विश्वास असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी म्हटले आहे. आज गुजरातमधील गांधीनगर येथील महात्मा मंदिर येथे चौथ्या जागतिक नवीकरणीय ऊर्जा गुंतवणूकदार परिषद आणि एक्स्पो (RE-INVEST)चे उद्‌घाटन केले. ही तीन-दिवसीय शिखर परिषद भारताच्या २०० GW पेक्षा जास्त स्थापित बिगर-जीवाश्म इंधन क्षमता साध्यतेच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्यांचा सन्मान करत आहे. मोदी यांनी यावेळी सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील कंपन्या, स्टार्ट-अप आणि प्रमुख उद्योग क्षेत्रातील अत्याधुनिक नवोन्मेषाचे दर्शन घडवणाऱ्या प्रदर्शनास्थळी पायी चालत आढावाही घेतला.

या कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधानांनी सर्व मान्यवरांचे रि-इन्व्हेस्ट शिखर परिषदेमध्ये स्वागत केले आणि पुढील तीन दिवसात ऊर्जा, तंत्रज्ञान आणि धोरणांच्या भवितव्यावर गंभीर चर्चा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या परिषदेतील चर्चा आणि अध्यनामुळे संपूर्ण मानवतेला फायदा होईल, असे मोदी यांनी सांगितले.या परिषदेत यशस्वी चर्चेसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधानांनी तब्बल ६० वर्षांनी एकाच सरकारला विक्रमी तिसऱ्यांना निवडून देण्याच्या जनमताचे महत्त्व अधोरेखित केले. “सरकारला सलग तिसऱ्या कार्यकाळासाठी निवडून देण्यामागे भारतीय जनतेच्या आकांक्षा हे कारण आहे”, मोदी यांनी नमूद केले. त्यांनी १४० कोटी नागरिक, युवा आणि महिलांचा विश्वास आणि आत्मविश्वास अधोरेखित केला, ज्यांची अशी धारणा आहे की त्यांच्या आकांक्षा या तिसऱ्या कार्यकाळात एक नवीन झेप घेतील. गरीब, दलित आणि वंचित यांना असा विश्वास वाटत आहे की सरकारचा तिसरा कार्यकाळ त्यांना सन्मानजनक जीवनाची हमी देणारा असेल, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. भारताचे १४० कोटी नागरिक भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याच्या संकल्पाने काम करत आहेत, असे ते म्हणाले. आजचा कार्यक्रम हा एक अलिप्त कार्यक्रम नसून २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा मोठा दृष्टीकोन, ध्येय आणि कृती योजनेचा एक भाग असल्याचे नमूद करून पंतप्रधानांनी सरकारने आपल्या कार्यकाळातील पहिल्या १०० दिवसांत घेतलेल्या निर्णयांवर प्रकाश टाकला.

“पहिल्या १०० दिवसांतील सरकारचे काम त्याच्या प्राधान्यक्रमांना अधोरेखित करते आणि त्यांची गती आणि प्रमाण यांना प्रतिबिंबित करते” भारताच्या गतिमान विकासाकरता आवश्यक असलेल्या सर्व क्षेत्रांवर भर देण्यात आला आहे, अशी माहिती देत त्यांनी नमूद केले. या १०० दिवसांमध्ये, पंतप्रधान म्हणाले की, देशाच्या भौतिक आणि सामाजिक पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यासाठी अनेक निर्णय घेतले गेले आहेत. भारत ७ कोटी घरे बांधण्याच्या मार्गावर आहे, जो आकडा काही देशांच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. तर गेल्या दोन कार्यकाळामध्ये ४ कोटी घरे लोकांना देण्यात आली आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. त्यांनी पुढे बोलताना, नवीन औद्योगिक शहरे निर्माण करण्याचा निर्णय, ८ हाय-स्पीड रोड कॉरिडॉर प्रकल्पांना मंजुरी, १५ पेक्षा जास्त सेमी-हाय स्पीड वंदे भारत गाड्यांचे लोकार्पण, संशोधनाला चालना देण्यासाठी १ ट्रिलियन रुपयांच्या संशोधन निधीची स्थापना, ई-मोबिलिटी चालविण्यासाठी विविध उपक्रमांची घोषणा, उच्च-कार्यक्षमता जैवनिर्मितीला प्रोत्साहन आणि बायो-ई3 धोरणाला मान्यता, या विषयी माहिती दिली.

गेल्या १०० दिवसातील हरित ऊर्जा क्षेत्रातील विकासावर प्रकाश टाकताना पंतप्रधानांनी, किनारपट्टीवरील पवनऊर्जा प्रकल्पांसाठी रु. ७ हजार कोटींची व्यवहार्यता तफावत निधीपुरवठा योजना सुरू केल्याची माहिती दिली. येत्या काही काळात भारत रु. १२ हजार कोटी खर्चाने ३१ हजार मेगावॉट जलविद्युतनिर्मिती करण्यासाठी काम करत आहे, असे त्यांनी सांगितले.

भारताची विविधता, प्रमाण, क्षमता आणि कार्यप्रदर्शन हे सर्व अद्वितीय असून भारतीय उपायांचे जागतिक उपयोजनेसाठी मार्ग प्रशस्त करणारे आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. गेल्या एका महिन्यात भारताने आयोजित केलेल्या जागतिक कार्यक्रमांची माहिती देताना पंतप्रधान म्हणाले की या महिन्याच्या सुरुवातीला ग्लोबल फिनटेक फेस्टचे आयोजन करण्यात आले होते, जगभरातील लोकांनी पहिल्या आंतरराष्ट्रीय सौर महोत्सवात, ग्लोबल सेमीकंडक्टर समिटमध्ये भाग घेतला होता, भारताने दुसऱ्या आशिया-पॅसिफिक नागरी विमान वाहतूक मंत्रिस्तरीय परिषदेचेही आयोजन केले होते. आणि, आज भारत हरित ऊर्जा परिषदेचे आयोजन करत आहे.

श्वेतक्रांती, मधु (मध) क्रांती आणि सौर क्रांतीचा साक्षीदार असलेला गुजरात आता चौथ्या जागतिक नवीकरणीय ऊर्जा गुंतवणूकदार बैठक आणि प्रदर्शनाच्या आयोजनाचा अनुभव घेत आहे, हा आनंदाचा योगायोग असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. “गुजरात हे भारतातील पहिले राज्य आहे ज्याचे स्वतःचे सौर धोरण आहे”, हे देखील पंतप्रधानांनी अधोरेखित केले. यानंतरच सौरऊर्जेबाबतची राष्ट्रीय धोरणे पुढे आली, असेही त्यांनी नमूद केले. हवामानाशी संबंधित मंत्रालय स्थापन करण्यात गुजरात जगभरात आघाडीवर आहे, असेही पंतप्रधानांनी अधोरेखित केले.जगाने ज्याचा विचारही केला नव्हता तेव्हापासून गुजरातने सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यास सुरुवात केल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

आजच्या कार्यक्रम स्थळाच्या ‘महात्मा मंदिर’ या नावाकडे लक्ष वेधून, पंतप्रधान म्हणाले की हे नाव महात्मा गांधींच्या नावावर ठेवण्यात आले होते, ज्यांनी जगासमोर हवामान आव्हानाचा विषय देखील उद्भवला नव्हता तेव्हा देखील या प्रश्नाबाबत जागरुक केले होते. महात्मा गांधींचे वचन उद्धृत करत पंतप्रधान म्हणाले – “पृथ्वीकडे आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेशी संसाधने आहेत, परंतु आपली हाव पूर्ण करण्यासाठी नाहीत.” महात्मा गांधींची ही दृष्टी भारताच्या महान परंपरेतून उदयास आली आहे, असेही ते म्हणाले. हरित भविष्य, निव्वळ शून्य उत्सर्जन हे शब्द शोभेचे नसून केंद्र आणि भारतातील प्रत्येक राज्य सरकारच्या गरजा आणि वचनबद्धता आहेत, अशी टिप्पणी पंतप्रधानांनी केली.

“२१ व्या शतकाचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा भारताची सौर क्रांती सुवर्णाक्षरात लिहिली जाईल”, असे गौरवोद्गार पंतप्रधानांनी काढले. शतकांपासून प्राचीन सूर्यमंदिर असलेले भारतातील पहिले सौर खेडे मोढेरा विषयी अधिक माहिती देताना त्यांनी निदर्शनास आणून दिले की आज या गावाच्या सर्व गरजा सौरऊर्जेद्वारे भागवल्या गेल्या आहेत. आज देशभरात अशा अनेक गावांचे सौर गावांमध्ये रूपांतर करण्याची मोहीम सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.

यावेळी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी; आंध्र प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि गोव्याचे मुख्यमंत्री उपस्थित होते.

अक्षय ऊर्जा उत्पादन आणि उपयोजनातील भारताच्या प्रभावी प्रगतीवर प्रकाश टाकण्यासाठी ४ थी वैश्विक अक्षय ऊर्जा गुंतवणूकदार परिषद आणि प्रदर्शनाचे (आरई इन्व्हेस्ट) आयोजन करण्यात आले आहे. अडीच दिवस चालणाऱ्या या परिषदेत जगभरातील प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. उपस्थित सर्वसमावेशक कार्यक्रमात सहभागी होतील ज्यात मुख्यमंत्र्यांचे पूर्ण सत्र, मुख्य कार्यकारी अधिकारी गोलमेज आणि नाविन्यपूर्ण वित्तपुरवठा, हरित हायड्रोजन आणि भविष्यातील ऊर्जा उपायांवर विशेष चर्चा होईल. जर्मनी, ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क आणि नॉर्वे या स्पर्धेत भागीदार देश म्हणून भाग घेत आहेत. गुजरात हे यजमान राज्य असून आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश भागीदार राज्ये म्हणून सहभागी होत आहेत.

यावेळी आयोजित प्रदर्शनात सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील कंपन्या, स्टार्ट-अप आणि प्रमुख उद्योजक यांचे अत्याधुनिक नवोन्मेष पाहता येतील. हे प्रदर्शन शाश्वत भविष्यासाठी भारताची बांधिलकी अधोरेखित करेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -