Monday, October 7, 2024
Homeब्रेकिंग न्यूजNitin Gadkari : देशात 'स्मार्ट सिटी' नव्हे तर 'स्मार्ट व्हिलेज'ची गरज

Nitin Gadkari : देशात ‘स्मार्ट सिटी’ नव्हे तर ‘स्मार्ट व्हिलेज’ची गरज

नितीन गडकरींची भूमिका

पुणे : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पानंतर आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी देशात ‘स्मार्ट सिटी’ नव्हे तर ‘स्मार्ट व्हिलेज’ची गरज असल्याचं सांगितलं. पुण्यात आयोजित ‘सीओईपी अभिमान पुरस्कार’ सोहळ्यात गडकरी पुढे म्हणाले की, कृषी क्षेत्राला जल, जमीन, जंगलच्या आधारावर नवीन तंत्रज्ञान दिलं तर खूप काही करण्यासारखं आहे.

नितीन गडकरी म्हणाले, “शेतकरी हा केवळ अन्नधान्याचा उत्पादक राहिलेला नसून तो ऊर्जादाताच्या भूमिकेतही शिरला आहे. कृषी क्षेत्रात देखील अनंत संधी दडलेल्या आहेत. आपली इंधनाची सध्याची आणि भविष्यातली देखील गरज भागवण्याची क्षमता कृषी उद्योगात आहे. ग्रामीण भागाच्या गरजा आणि गरजवंतांचा मानवी चेहरा केंद्रस्थानी ठेवून संशोधन करत तंत्रज्ञानाचा विकास झाल्यास, ग्रामीण भागातून येणारे लोंढे गावातच थांबतील. त्यांना स्थानिक पातळीवरच रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील”. कृषी आणि ग्रामीण भागाचा जीडीपी केवळ पंधरा ते सोळा टक्के आहे. ते योगदान वाढण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध करून देणे आपल्याला शक्य आहे. कृषी उद्योगाला ऊर्जा निर्मितीचाही पर्याय दिल्यास अधिक क्षमतेने प्रगती करता येईल, असा मला विश्वास आहे.

पुढील सहा महिन्यात मुंबई-बंगळुरू या १४ लेन महामार्गाचं काम सुरू होणार आहे. मुंबईतील अटल सेतू उतरला की, थेट एक्स्प्रेस महामार्गाला लागता येणार आहे. हा महामार्ग थेट रिंग रोडशी जोडलेला असेल आणि यामुळं मुंबई-बंगळुरू प्रवास अधिक गतीनं करता येईल. तसंच पुणे-औरंगाबाद हे अंतर केवळ दोन तासांवर येईल, असंही गडकरी यांनी यावेळी सांगितलं.

यावेळी सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ (सीओईपी टेक) आणि सीओईपी माजी विद्यार्थी संघटना यांच्यावतीनं देण्यात येणारा, ‘सीओईपी अभिमान पुरस्कार’ देश आणि परदेशातील तंत्रज्ञान क्षेत्रात मोलाचं योगदान देणा-या माजी विद्यार्थ्यांना देण्यात आला. आज अभियंता दिनाचं औचित्य साधून नितीन गडकरी यांच्याहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी यंदाचा ‘सीओईपी जीवनगौरव पुरस्कार’ अहमदाबाद येथील भगवती स्फेरोकास्ट प्रा. लि. चे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक ज्येष्ठ उद्योगपती पी.एन. भगवती यांच्यावतीनं लोहिया यांनी स्वीकारला. तर यंदाच्या सीओईपी अभिमान पुरस्काराने अभिनेता वैभव तत्ववादी, राज्याच्या पर्यावरण विभागाचे मुख्य सचिव आयएएस अधिकारी प्रवीण दराडे, सिक्कीमचे कॅबिनेट मंत्री राजू बसनेत, अमेरिकेतील ‘जे.पी. मॉर्गन चेस’च्या कार्यकारी संचालक मोनिका पानपलिया आणि अमेरिकेतील टेस्ला मोटर्सचे वरिष्ठ संचालक हृषीकेश सागर यांना देण्यात आला.

गडकरींना पंतप्रधान पदाची ऑफर!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर देशाचा पंतप्रधान कोण असेल, याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जातात. यातच नितीन गडकरी यांचे नाव कायम आघाडीवर असते. अशातच त्यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर लगेच ‘मला पंतप्रधान पदाची ऑफर होती’ असा गौप्यस्फोट केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. विरोधीपक्षाच्या एका नेत्यानं मला पंतप्रधान पदाची ऑफर दिली होती, असं देखील ते म्हणाले. पंतप्रधान होणं माझ्या जीवनाचं लक्ष्य कधीही नव्हतं. मी माझ्या पक्षाशी एकनिष्ठ असल्याचं त्यांनी सांगितलं. नितीन गडकरींच्या या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -