मुंबई : महाराष्ट्रात २१ सप्टेंबरपासून पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख (Punjabrao Dakh) यांनी वर्तवली आहे. येत्या चार पाच दिवसांपर्यंत राज्यात हवामान कोरडे राहील, मात्र २१ सप्टेंबरपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, तो सप्टेंबरच्या शेवटपर्यंत कायम राहील.
विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा तसेच कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक असेल. विशेषतः नांदेड, लातूर, परभणी, पुणे, कोल्हापूर, सांगली या भागांमध्ये २ ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
५ नोव्हेंबरपासून राज्यात थंडी
डख यांनी शेतकऱ्यांना पीक व्यवस्थापनाबाबत सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. उडीद, सोयाबीन यासारखी पिके तयार झाल्यास ती लवकर काढण्याची शिफारस त्यांनी केली आहे, कारण पुढील ११ दिवसांमध्ये पावसाचा जोर कायम राहील. तसेच ५ नोव्हेंबरपासून राज्यात थंडीची सुरुवात होईल, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे.
संपूर्ण राज्यासाठी हा पावसाचा अंदाज अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे, विशेषतः शेती आणि ग्रामीण जीवनावर याचा मोठा परिणाम होऊ शकतो.