किश्तवाड : जम्मू-काश्मिरातील विरोधी पक्ष हे कुटुंब केंद्रीत राजकारण करणारे आहेत. स्वतःच्या फायद्यासाठी त्यांना राज्यात दहशतवाद वाढवायचा आहे. परंतु, भाजपा सरकार सत्तेत आल्यास दहशतवाद (terrorism) जमिनीत गाडून टाकू असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केले.
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड येथे सोमवारी आयोजित सभेत ते बोलत होते. सभेला संबोधित करताना अमित शाह यांनी विरोधी पक्षांवर जोरदार टीकास्त्र सोडले. नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसवर ‘आपल्या कुटुंबाचे सरकार’ बनवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. तसेच, नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस जम्मू-काश्मीरमध्ये सत्तेवर येऊ शकत नसल्याचे शाह म्हणाले. याशिवाय, ओमर अब्दुल्ला आणि राहुल गांधी यांना राज्यात पुन्हा एकदा दहशतवाद वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र भाजप सरकार दहशतवाद जमिनीत गाडून टाकेल असे शाह यांनी सांगितले.
काँग्रेस आणि त्यांचे नेते राहुल गांधी यांना जम्मू-काश्मीरला पुन्हा दहशतवादाकडे ढकलायचे आहे, असे सांगत अमित शाह म्हणाले की, काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सचे सरकार आले तर दहशतवाद सुरू होईल. मी तुम्हाला वचन देतो. आम्ही दहशतवादाला गाडून टाकू. आम्ही दहशतवादाला अशा स्तरावर गाडून टाकण्याचा संकल्प केला आहे की, तो परत येऊ शकत नाही.” याशिवाय, जम्मू-काश्मीरमधील निवडणुकीचे वातावरण पाहत असल्याचे सांगत ना अब्दुल्लांचं सरकार बनतंय ना राहुल गांधींचं सरकार. यावेळी खोऱ्यात भाजपाच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल, असा दावा अमित शाह यांनी केला.