जाणून घ्या कशी असणार प्रक्रिया?
वॉशिंग्टन डीसी : महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना अमेरिकेमध्ये (America) देखील अध्यक्षीय निवडणुकांची (Presidential Elections) धामधूम सुरु आहे. येत्या ५ नोव्हेंबर रोजी अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत. कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील चर्चांना उधाण येत असून अमेरिकेतील या निवडणुकांवर अंतराळात अडकेलेले नासाचे अंतराळवीर (Astronaut)देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सुनीता विल्यम्स (Sunita Williams) आणि बुच विल्मोर (Butch Wilmore) हे चक्क अंतराळातून मतदान प्रक्रिया करणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेत ५ नोव्हेंबरला राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत. दरम्यान सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोघेही टेक्सासचे रहिवाशी आहेत. त्याचबरोबर अमेरिकेचे नागरिक म्हणून ते अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यामुळे हे दोघेही अंतराळवीरांसाठी डिझाइन केलेल्या प्रक्रियेचा वापर करून मतदान करणार आहेत.
कशी आहे मतदान प्रक्रिया?
नासाच्या स्पेस कम्युनिकेशन्स अॅण्ड नेव्हिगेशनमधील (SCaN) प्रणालीद्वारे ही प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. अंतराळवीर अंतराळातून इलेक्ट्रॉनिक मतपत्रिका भरतात. त्यानंतर मतपत्रिका एनक्रिप्ट केली जाते आणि नासाच्या नियर स्पेस नेटवर्कद्वारे पृथ्वीवर पाठवली जाते. एनक्रिप्शनमध्ये ही माहिती कोडमध्ये रूपांतरित करण्यात येते. इथून पुढे नासाच्या ट्रॅकिंग आणि डेटा रिले सॅटेलाइटमधून न्यू मेक्सिकोमधील ग्राउंड अँटेनाद्वारे ह्युस्टनमधील मिशन कंट्रोलकडे पाठवली जाते. सर्वात शेवटी ती संबंधित काउंटी क्लर्ककडे पाठवली जाते.