निसर्गवेद – डॉ. महालक्ष्मी वानखेडकर
ॲमेझॉन येथे लहान, विशाल, पोतयुक्त, अंगावर ठिपक्यांची नक्षीदार शाल घेऊन असलेल्या पाठीवरचे पंख, विस्कटलेल्या पंखांचे, आकर्षक, चित्रविचित्र आकारांचे, शिंग, मिशा असणारे रंगीबेरंगी, सुंदर तरीही वैविध्यपूर्ण अद्भुत असे हे विशिष्ट जीवनशैली असणारे पक्षी आहेत. काही पक्षी तर अक्षरशः स्वर्गातून आल्यासारखे वाटतात म्हणून त्यांना स्वर्गीय पक्षी म्हणतात.
ॲमेझॉनमध्ये गिधाडांच्या चार प्रजाती आहेत. त्यातीलच एक “गिधाड राजा”. ज्याचा उल्लेख माया सभ्यतेच्या ग्रंथांमध्ये सुद्धा आहे. चोचीवर विशिष्ट पद्धतीचे लालसर तांबड्या रंगाचे मांसल गोळे पिवळ्या, लाल, काळ्या, निळ्या, जांभळ्या रंगांचे मांसल नक्षीदार असे पिस विरहित डोके, राखाडी- पांढऱ्या रंगांचा संगम असणारे शरीरावरील पंख असे हे विशाल काय पण सुंदर रंगीत गिधाड म्हणून त्याला “राजा गिधाड” असे म्हणतात.
पोपटांच्या तर अनेक जाती-प्रजाती येथे पाहायला मिळतात. पफ बर्ड सारखे नाजूक, लाजाळू पक्षी जे फक्त सकाळ आणि संध्याकाळ जोरात शिट्टी वाजवूनच बोलतात इतर वेळी ते अगदी शांत असतात. रूफस-नेक्ड पफबर्ड (मैलाकोप्टीला रूफा), पेरूपासून अमेजन नदीपर्यंत दक्षिणी अमेजन वर्षावनामध्ये आढळणारी एक प्रजाती आहे. नदीच्या दोन्ही किनारी हे पक्षी थोड्याफार फरकाने वेगळे दिसतात. एकाच ठिकाणी राहणारे फक्त किनाऱ्याच्या अलीकडे पलीकडे असून हे पक्षी वेगळे का? हा प्रश्न वादातींत आहे. माझ्या मते ही निसर्गनियमानुसार असणारी निसर्ग रचना आहे. स्केल क्रिस्टेड पिग्मी नावाप्रमाणेच पिवळे, तांबूस, पोपटी रंगाचे असून काळपट रंगाच्या रेषा यांच्या पंखांवर असतात.
वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, होआटझीन पक्ष्याचे डायनासोरशी बरेचसे तथ्य जुळत आहे. तसं तर या पक्ष्यांच्या प्रजातीबद्दल वैज्ञानिकांमध्ये संभ्रम आहे. हा गुयानाचा राष्ट्रीय पक्षी आहे तेथे याला “कैंजे तितर” म्हणून ओळखतात. होआटझीन हे पक्षी दलदल, नदीकाठी आणि मॅग्रोंवच्या जंगलात आढळतात. याची लांबी २६ इंचांपर्यंत असते, उंच मान आणि निळ्या रंगाचे पंख विरहित छोटे डोके, डोक्यावर लाल टोकदार पंखांचा मुकुट, मरून रंगाचे डोळे, राखाडी रंगाची चोच, पाठीवर काळे आणि पांढऱ्या रेषांचे पंख, तांब्यासारखी हिरवट रंगाची शेपूट, शेपटाखाली पिवळ्या तांबूस रंगाची पिसं असा एकूण थोडा कोंबडी सारखा दिसणारा, आकर्षक, सुंदर पक्षी होआटजीन. हा विशिष्ट पद्धतीने पंख पसरवतो आणि सतत कर्कश्यपणे ओरडत राहतो तर कधी गुरुगुरुतो. जर कोणत्याही शिकारी पक्ष्याने यांच्या पिल्लांवर हल्ला केला तर हे पक्षी पिल्लांच्या सुरक्षिततेसाठी खूप कर्कश्य आवाजात ओरडतात. शिकाऱ्याचे लक्ष त्यांच्या पिल्लांकडून स्वतःकडे वळवतात. तोपर्यंत पिल्लं झाडांच्या पानांमध्ये लपतात किंवा झाडांवरून पाण्यामध्ये उड्या मारतात आणि पाण्याखाली पंखांचा उपयोग पंजांसारखा करून पाण्यात पोहत राहतात. यांच्या प्रत्येक पंखाखाली एक पंजा असतो असे म्हणतात.
याचा उपयोग ते झाडावर चढण्यासाठी करतात. अगदी पिल्लं सुद्धा त्यांच्या पंखांचा उपयोग पंजासारखा करतात. हे शाकाहारी असून फळं, फुलं आणि पानं खातात. यांचे पाचन तंत्र खूपच आश्चर्यकारकरीत्या कार्य करते. त्यात विशिष्ट प्रकारचे असणारे बॅक्टेरिया हे पानांचे पचन खूप सहज करते. खरंतर या पक्ष्यांना दात नसतात; परंतु यांना दात आहेत जे पानांचे बारीक तुकडे करण्यात मदत करतात. यांचा प्रजनन काळ पावसाळ्यात असून दोन ते तीन अंडी हे पक्षी देतात.
नदीजवळ राहणाऱ्या पक्ष्यांमध्ये ॲमेझॉन किंगफिशर हा इतर किंगफिशरपेक्षा थोडा मोठाच दिसतो. १२ इंच लांबी आणि १०० ते १४० ग्रॅम वजन असते. यांची चोच लांब आणि शेपूट खूप लहान असते. जास्तीत जास्त पाठीचा भाग हिरवट, पांढरे पोट अशा रंगात हे पक्षी येथे दिसतात. यांची दृष्टी तीक्ष्ण असून हे चांगले शिकारी असतात. हे कीटक आणि मासे खातात. कॅप्ड हेरॉन म्हणजे बगळेच. निळ्या रंगाची चोच, डोक्यावर काळ्या रंगाची टोपी घातल्यासारखा मुकुट असतो आणि त्यातून लांबट अशी पिसे निघतात जी त्या मुकुटाची शोभा वाढवतात. यांचे शरीर थोडे पिवळसर पांढरे असते. तर मोटमोट हा किंगफिशर जमातीतील अतिशय सुंदर रंगीबेरंगी नदीकिनारी लांबट घरट्यांमध्ये झुंडीने राहणारा पक्षी.
राखाडी डोक्याचा पतंग हा दलदलीत आणि जंगलात आढळतो. साप, किडे, बेडूक हा त्यांचा आहार काळ्या-पांढऱ्या, भुरकट रंगाचे मिश्रण असणारा. शिंगवाला कैनवा हा तीन फुटांचा विचित्र असा बदकासारखा दिसणारा दलदलीत राहणारा, डोक्यावर शिंग असणारा, विचित्र कर्कश्य आवाजात ओरडणारा पक्षी. जाबीरू सारस चार ते पाच फूट उंचीचा, लाल पीस विरहित मानेचा, काळा डोक्याचा, पांढऱ्या रंगाचा उडणारा असा आकर्षक पक्षी. ग्रे ऐंटव्रेन हा जेमतेम चार इंचांचा इवलासा पक्षी. झुंडीत राहणारा ॲमेझॉनमधील नदीकाठी आढळतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पूर्व-पश्चिम असणाऱ्या नदीकाठी दोन्हीकडे हे पक्षी वेगवेगळे आढळतात. पूर्व किनाऱ्यावरील पक्ष्यांचा गळा राखाडी तर पश्चिम किनाऱ्यावरील पक्ष्यांचा गळा काळा आहे.
अनेक पक्षी असे आहेत की, ज्यांची नावचं अजून माहीत नाहीत म्हणजे त्यांची नावच ठेवली गेलेली नाहीत. वैज्ञानिकांना नवनवीन पक्षी हे कायमच या वर्षावणात दिसत असतात. ज्यांचे उल्लेख अजूनही कुठे मिळत नाहीत. पक्ष्यांची नावे ही त्यांच्या वर्णनानुसार ठेवली जातात. पक्षी सामाजिक, ऊर्जावान आणि झुंडीत राहणारे आहेत.
ॲमेझॉन जंगल म्हणजे या जगातील निर्धास्तपणे जगण्यासाठी असणारे पक्ष्यांचे मोठे घर. पक्षी सतत चिवचिवाट, कलकलाट करत असल्यामुळे खूप सुंदर, मधुर, उपचारात्मक, ऊर्जात्मक असे वातावरण या जंगलातील आहे.
भयंकर प्रमाणात होणारी जंगलतोड, वृक्षतोड ही ॲमेझॉनच्या वनासाठी अत्यंत घातक आहे. विशेषतः कीटक आणि पक्ष्यांसाठी; परंतु आता मानवाने स्वतःच्या प्रगतीसाठी सुख-सोयींसाठी वृक्षतोड आणि वणवा पेटविण्यासारख्या केलेल्या उलाढाल्यामुळे प्राकृतिक आपत्तींना तोंड देण्याची वेळ या जीवजंतूूंवर आली आहे. प्राकृतिक संतुलन ढासळल्यामुळे त्यांना अन्न आणि निवारा न मिळाल्यामुळे बरेचसे पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत किंबहुना कित्येक नामशेष झाले सुद्धा असतील जे आपल्याला ज्ञात नाही. मानवी खोटी प्रगती ही इतर जीवसृष्टीची अधोगती आहे. आपण या प्रकृतीमध्ये ढवळाढवळ केल्यामुळे कुठे तरी या नैसर्गिक सौंदर्याला मुकत आहोत. साहजिकच आपण आपले मानसिक आणि शारीरिक खच्चीकरण करत आहोत हे विसरून चालणार नाही.