मुंबई : मुंबईतील इंडिगो एअरलाईन्सबाबत (Indigo Flight) सातत्याने नवनवीन अपडेट्स समोर येत असतात. अशातच आज इंडिगो विमानतळावर हवाई प्रवाशांचा मोठा खोळंबा झाल्याची माहिती मिळत आहे. मुंबइहून दोहा-कतारला जाणारे इंडिगोचे विमान तब्बल ६ तासानंतर रद्द (Flight Canceled) करण्यात आले. त्यामुळे या विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी इंडिगोबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे ३ वाजून ५५ मिनिटांच्या सुमारास उड्डाण करणार होते. मात्र विमानात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे हे विमान ६ तासांनंतर रद्द करण्यात आले.
या विमानात २०० ते ३०० प्रवासी होते. प्रवाशांना विमानात चढवल्यानंतर विमान तासनतास विमानतळावरच उभे होते. सुमारे ५ तास प्रवाशांनी विमान उड्डाण होण्याची वाट पाहिली तसेच त्यांना विमानातून उतरण्याची परवानगी देखील दिली नव्हती. परंतु प्रवाशांचा संताप वाढल्यावर क्रू मेंबर्सनी त्यांना फ्लाइटमधून उतरण्याची परवानगी दिली आणि इमिग्रेशन वेटिंग एरियामध्ये नेले. तांत्रिक बिघाडामुळे उड्डाण रद्द करण्यात आल्याचे इंडिगोने म्हटले.
प्रवाशांचा संताप
प्रवाशाने असा दावा केला की, या काळात त्याला पाणी आणि अन्नही मिळाले नाही.
इंडिगोने काय म्हटले?
इंडिगो एअरलाइन्सने या प्रकाराबाबत एक निवेदन जारी केले आहे. त्यामध्ये असे म्हटले आहे की, ‘आम्ही विमान एकदा किंवा दोनदा उतरण्याचा प्रयत्न केला, परंतु यश आले नाही. त्यामुळे आम्ही फ्लाइट रद्द केली आहे. पुढील फ्लाइटसाठी रिबुकिंग केले जात आहे. तसेच विमानतळावरील आमच्या टीमने त्यांना खाद्यपदार्थ पुरवले आणि प्रत्येक गरजेमध्ये मदत केली. प्रवाशांसाठी हॉटेल्सही बुक केली जात आहेत’.