नॉस्टॅल्जिया – श्रीनिवास बेलसरे
मराठीत भावगीतांचा मोठा सुखद काळ येऊन गेला. त्यात सर्वात मोठे योगदान भावमधूर कविता लिहिणाऱ्या कवींचे होते, तसेच ते आकाशवाणीचेही होते! कविता जेव्हा ग्रंथालयाच्या उंच उभ्या कपाटात इतर पुस्तकांच्या गठ्ठ्याखाली दबली जाऊन कसाबसा श्वास घेत पडलेली असते तेव्हा तिला काहीच भवितव्य नसते. क्वचितच फिरकणारा एखादा कलंदर जाणकार रसिक तिची काही पाने उलगडून वाचून निघून जातो. तेवढे क्षणच कवितेला मोकळा श्वास घ्यायला मिळतो.
पण जेव्हा एखादा संगीतकार तीच कविता वाचतो, तिच्या गाभाऱ्यात शिरून अर्थाची घंटा वाजवतो तेव्हा ते दैवत जागृत होते. प्राचीन अंधाऱ्या देवळात समईच्या अनेक वाती पेटवल्यावर जसा अवघा घुमट उजळून निघावा तसा मनाचा गाभारा स्वयंप्रकाशी तेजाने प्रदीप्त होतो. नेमके हेच काम तत्कालीन आकाशवाणीने केले होते. आकाशवाणीने सिद्धहस्त संगीतकारांच्या मदतीने अनेक महान कवींच्या कविता अजरामर करून टाकल्या. विशाल मराठी समुदायातील ३० वर्षांच्या वरच्या वयोगटातील मनांवर राज्य करणारी मराठीतली भावगीते म्हणजे त्याच कविता होत्या.
मराठीत अलीकडे जरी भावगीतांची प्रथा बंद पडली असली तरी एकेकाळी भावगीत परंपरेने मराठी भावविश्वावर अधिराज्य गाजवले होते. रेडीओ हे घरगुती मनोरंजनाचे एकमेव आणि उत्तम साधन होते तेव्हाची ही गोष्ट. तेव्हा गाणे लोकप्रिय होण्यासाठी ते सिनेमातलेच असले पाहिजे अशी सवंग अट नव्हती! एकंदरच समाजाची अभिरुची खूप उच्च दर्जाची होती. अनेक मराठी भावगीतांचे लोकमानसांवर अधिराज्य होते.
अनेक कवी आणि गायक केवळ भावगीतांमुळे प्रसिद्धीस आले. ते जुन्या श्रोत्यांच्या स्मरणात आजही विराजमान आहेत. गायकात गजानन वाटवे, माणिक वर्मा, सुधा मल्होत्रा, मालती पांडे, रामदास कामत अशी अगणित नावे आहेत, तर कवी म्हणून शांता शेळके, शांताराम नांदगावकर, राजा मंगळवेढेकर, मधुकर जोशी, राजा बढे, पी. सावळाराम, जगदीश खेबूडकर अशा असंख्य दिग्गजांचे चेहरे डोळ्यांसमोर येतात.
असेच एक भावगीतकार होते सुर्यकांत खांडेकर. त्यांच्या ध्वनीमुद्रित झालेल्या गाण्यांची संख्या जास्त नसली तरी मुळचे शिक्षक असलेल्या खांडेकर यांच्या कविता त्या काळात अनेक साहित्यिक नियतकालिकांत नियमितपणे प्रकाशित होत असतं. पुढे शिक्षकी नोकरी सोडून ते रयत शिक्षण संस्थेच्या कीर्ती महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक झाले. खांडेकर हे शाहीर पीराजीराव सरनाईक यांचे पुतणे! शाहिरांच्या व्यक्तिमत्वाच्या प्रभावामुळे सूर्यकांत खांडेकरांनी मराठी पोवाड्यांचा संशोधनपर इतिहासही लिहिला. त्यांच्या काही कविता बालभारतीच्या पुस्तकात घेतल्या गेल्या होत्या. तशी काही गीते मराठी चित्रपटांसाठीही निवडली गेली.
त्यांचे एक भावगीत आजही असंख्य मराठी मनांना अलगद भूतकाळात घेऊन जाते. ते काहींना नक्कीच उदासही करून टाकत असेल पण ही उदासी, हा हळवेपणा अनेकदा हवाहवासा वाटतो हेही आपल्याला एका पातळीवर जाणवत राहते. आशाताईंनी श्रीनिवास खळे यांच्या संगीत दिग्दर्शनात गायलेले ते भावगीत श्रीनिवास खळ्यांनी ‘पहाडी’ रागावर बेतले होते.
जिवलगाच्या भेटीसाठी आसुसलेल्या, अगदी ‘भेटीलागी जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिन वाट तुझी.’ अशा भावावस्थेत गेलेल्या विरहिणीच्या भावना मांडणाऱ्या त्या भावमधुर गाण्याचे शब्द होते-
‘सहज सख्या एकटाच, येई सांजवेळी,
वाट तुझी पाहीन त्या आम्रतरुखाली.’
आशाताई तेव्हा किती तरुण असाव्यात. सूर्यकांत खांडेकरांनी ते लिहिल्याची तारीख उपलब्ध आहे. ती होती ३ नोहेंबर १९५७! म्हणजे आजपासून ६७ वर्षांपूर्वी हे गाणे लिहिले गेले. आशाताईंनी एखाद्या विशीतल्या प्रेमविव्हल मुग्ध तरुणीचा वाटावा असा सूर लावला होता. अतिशय हळुवारपणे गायलेले हे गीत त्याकाळी प्रत्येक मराठी तरुणीने एकदा तरी गुणगुणलेले असायचेच.
त्या जिवलगाशी कितीतरी दिवस भेट झालेलीच नाही. खरे म्हणजे पहिली भेट तरी झाली होती की नाही तेही माहीत नाही. तो आशाताईंनीच गायलेला काल्पनिक ‘परीकथेतील राजकुमार’ तर नाही ना अशीही शंका येऊ शकते. पण प्रिया मनातल्या मनात त्याच्याशी होऊ घातलेल्या सुंदर, संयत, प्रेमभेटीची स्वप्ने रंगवते आहे. तिला प्रियकराला सांजवेळी
भेटायचे आहे.
‘सांजवेळ’ आणि ‘संध्याकाळ’मध्ये थोडा फरक आहे. संध्याकाळ हा संधीकाल आहे. दिवस आणि रात्र यांच्यामधला संक्रमणाचे क्षण! तो फक्त त्या क्षणाच्या वेळेची माहिती देतो. पण ‘सांजवेळ’ कातर असते. हुरहूर लावते. सांजवेळ आतून हळवे करत असते!
त्यावेळी तिला प्रियकराबरोबर काय करायचे आहे? त्या भाबडीला फक्त त्याच्यासोबत हिरवळीवर बसायचे आहे, गाणे गायचे आहे. त्या संधीप्रकाशात न्हायचे आहे. किती साधे, किती मनस्वी पण किती सयंत स्वप्न! रोज सूर्य जगाचा निरोप घेताना संध्याकाळी पश्चिम क्षितिजावर जी लाली उधळतो तीच अंगाभोवती परिधान करून या प्रेमातुर प्रियेला प्रेमस्वप्न पाहत प्रियकराबरोबर हितगुज करायचे आहे.
‘हिरवळीत गीत गात,
सांजरंगी न्हात न्हात,
स्वप्नांना रंगवुया, लेवुनिया लाली.
सहज सख्या…’
गाण्यात जरी ती स्वत:ची इतकी साधीभोळी स्वप्ने मोकळेपणाने सांगत असली तरी तिचा खरा स्वभाव संकोचीच आहे, लाजाळू आणि मुग्ध आहे. आपल्या प्रेमाची पहिली कबुली तरी तिने त्याच्याकडे दिली आहे की नाही, माहीत नाही. म्हणून त्याला दिलेले निमंत्रण आकर्षक करण्यासाठी ती म्हणते, ‘जे मी ओठापर्यंत येऊनही बोलू शकले नाही. ते मनातले गुपित मी आपल्या भेटीत तुला सांगेन.’ पण आजच्या या सांजवेळी तू भेटायला येच. आपली प्रीती माझ्याकडून अव्यक्त राहिली आहे. त्यामुळे तुझ्याकडूनही प्रतिसाद आलेला नाही. आपले प्रेम आजवर अबोलच राहून गेले आहे. आज आपण भेटू आणि मावळत्या सूर्याच्या साक्षीने ते मनमोकळेपणे व्यक्त करू या, साजरे करू यात! तू सहजच येऊन जा.
‘अधरी जे अडत असे,
सांगीन तुज गुज असे.
प्रीति ही प्रीतिविण, अजुनही अबोली…
सहज सख्या…’
ती तिच्या आवडत्या आम्रतरूखाली बसली आहे आणि आजूबाजूला पसरलेल्या हिरवळीत आलेली सुंदर, मनोहारी रंगांची चिमुकली रानफुले न्याहळते आहे. त्यातल्या काही कळ्या अजून अर्धोन्मीलित आहेत. तिला त्या कळ्यात, त्या फुलात दोघांच्या अबोल, मुग्ध मनांचा भास होतो. म्हणून ती म्हणते, ‘आपण एकांतात या हिरवळीवर बसू तेंव्हा ती रानफुले फुलतील. चंद्र उगवेल, चांदणे पडेल आणि या गवतातल्या चिमुकल्या फुलांसारखी आपली मनेही चंद्रप्रकाशात उमलतील. आपली भावभोळी प्रीती फुलेल.
‘तृणपुष्पे मोहक ती,
उमलतील एकांती.
चांदण्यात उमलवुया,
प्रीत भावभोळी.
सहज सख्या…’
आजचे एकंदरच समाजाचे कठोर, बधीर आणि कोरडे होत चाललेले भावविश्व जाणवत राहते तेंव्हा अशी भावूक, हळवी, ओल्याकंच भावनांनी भिजलेली गाणी जरूर ऐकावीत. सभोवतालच्या भीषण वास्तवात मिळणारा तो क्षणभरचा विसावा का असेना, खूप दिलासा देऊन जातो.