Sunday, April 20, 2025
Homeक्रीडाNeeraj Chopra : नीरज चोप्राचे विजेपद अवघ्या एका सेंटीमीटरने हुकले

Neeraj Chopra : नीरज चोप्राचे विजेपद अवघ्या एका सेंटीमीटरने हुकले

८७.८६ मीटर भाला फेकत दुसरा क्रमांक; ८७.८७ मीटर भाला फेकत अँडरसन पीटर्स प्रथम

ब्रुसेल : नीरज चोप्रा (Neeraj Chopra) हाताला फ्रॅक्चर असतानाही शनिवारी डायमंड लीग फायनलमध्ये उतरला होता. या स्पर्धेत त्याचा अव्वल क्रमांक अवघ्या एका सेंटीमीटरने हुकला. शनिवारी ब्रुसेलमध्ये झालेल्या डायमंड लीग फायनलमध्ये भालाफेकीच्या प्रकारात उतरला होता. या स्पर्धेत त्याला सलग दुसऱ्यांदा दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे अवघ्या एका सेंटीमीटरने त्याचे विजेतेपद हुकले.

दरम्यान, या स्पर्धेनंतर नीरजने सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे की, त्याच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर आहे, मात्र असे असतानाही तो स्पर्धेत उतरला होता. गेल्या काही महिन्यांपासून नीरज दुखापतींचा सामना करत आहे. मांडीच्या जवळ असलेल्या दुखापतीवर वैद्यकिय सल्ला घेण्यासाठी तो पॅरिस ऑलिम्पिकनंतर जर्मनीला देखील गेला होता. पण त्यानंतरही त्याने लॉझान डायमंड लीग खेळली होती. यानंतर तो ब्रुसेल डायमंड लीग फायनलसाठी पात्रही ठरला होता. तो शनिवारी ८७.८६ मीटर भाला फेकत दुसऱ्या क्रमांकावर राहिला. पहिल्या क्रमांकावर राहिलेल्या अँडरसन पीटर्सने ८७.८७ मीटर लांब भाला फेकला होता. या स्पर्धेसह यंदाच्या वर्षातील नीरजसाठी चालू हंगामही संपला आहे. यानंतर आता नीरजने त्याच्या फ्रॅक्चर असलेल्या हाताचा फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे. एक्स-रेमध्ये दिसले की माझ्या डाव्या हाताचे मेटाकार्पल फ्रॅक्चर झाले आहे. माझ्यासाठी हे आणखी वेदनादायी आव्हान होते. पण माझ्या टीमने मला खूप मदत केली, त्यामुळे मी ब्रुसेलमध्ये सहभागी होऊ शकलो.

नीरजने ऑगस्टमध्ये पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेतही रौप्य पदकाची कमाई केली होती. तो ऍथलेटिक्समध्ये दोन ऑलिम्पिक पदके स्वातंत्र्यानंतर भारताला मिळवून देणारा पहिलाच खेळाडू आहे. त्याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. त्याने वर्ल्ड ऍथलेटिक्समध्येही सुवर्णपदक जिंकले आहे. तसेच २०२२ मध्ये तो डायमंड लीग जिंकणारा पहिला भारतीय ठरला होता. २०२३ डायमंड लीग फायनलमध्येही तो दुसऱ्या क्रमांकावर राहिला होता.

ही या वर्षातील शेवटची स्पर्धा होती आणि मला माझा हंगाम मैदानातच संपवायचा होता. जरी मी स्वत:च्या अपेक्षेनुसार कामगिरी करू शकलो नसलो, तरी मी या हंगामातून खूप काही शिकलो आहे. आता मी पूर्ण तंदुरुस्त होऊन पुन्हा परतण्यासाठी उत्सुक आहे. तुम्ही सर्वांनी दिलेल्या प्रोत्साहनासाठी आभार. २०२४ वर्षाने मला एक चांगला खेळाडू आणि व्यक्ती बनवलं. २०२५ वर्षांची वाट पाहतोय’, असे नीरज चोप्रा याने म्हटले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -