रेल्वे प्रशासनाने आखला नवा प्लॅन
मुंबई : मुंबईतील लोकल ट्रेन (Mumbai Local) प्रवाशांसाठी मोठी दिलासा देणारी बातमी आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केले की आगामी तीन वर्षांत लोकल ट्रेन फेऱ्या दुप्पट होणार असून, दोन लोकलमधील अंतर १८० सेकंदांवरून १५० सेकंदांवर आणले जाईल. यासाठी कम्युनिकेशन्स बेस्ड ट्रेन कंट्रोल (CBTC) प्रणाली लागू केली जाणार आहे. यामुळे प्रत्येक अडीच मिनिटांनी लोकल ट्रेन धावेल, त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल आणि गर्दी कमी होईल.
मुंबईतील तिन्ही मार्गांवर ही प्रणाली लागू होणार आहे. सध्या, तांत्रिक अडचणी आणि वेळापत्रकातील अनियमितता यांमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. मात्र, CBTC प्रणालीमुळे हे प्रश्न सुटतील आणि ट्रेन सेवा अधिक नियमित आणि वेगवान होईल. या तंत्रज्ञानाचा वापर करणारे मुंबई हे देशातील पहिले शहर ठरणार आहे.
याशिवाय, ट्रेनच्या सुरक्षिततेसाठी कवच अँटी-कोलिजन तंत्र देखील वापरले जाणार आहे, जे अपघातांचा धोका कमी करेल. CBTC आणि कवच यंत्रणांच्या संयुक्त वापरामुळे ट्रेनमधील अंतर कमी होईल, अपघात टाळता येतील, आणि प्रवास अधिक सुरक्षित होईल. हा प्रकल्प मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प (MUTP) फेज 3A अंतर्गत राबवला जात आहे, जो मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनने विकसित केला आहे.
ही प्रणाली येत्या काही महिन्यांत अंमलात येईल, आणि त्यानंतर मुंबईतील प्रवास जलद, अधिक सुरक्षित आणि आरामदायी होईल. प्रवाशांना अडीच मिनिटांच्या अंतराने उपलब्ध होणाऱ्या ट्रेनमुळे त्यांचा दैनंदिन प्रवास अधिक सुकर होईल.