Sunday, October 6, 2024
Homeसाप्ताहिककिलबिलभूक कशी लागते?

भूक कशी लागते?

कथा – प्रा. देवबा पाटील

बरे, आई आजही मला खूपच भूक लागली आहे. मी येताबरोबर आज काही मागतिले नाही कारण तू परवालाच सांगितले होते की खेळून आल्यावर ताबडतोब काहीच खाऊ-पिऊ नये. आता बराच वेळ झाला. आता मी तर शांतही झाले आहे पण माझ्या पोटात कावळे ओरडू लागले आहेत. आता मला काहीतरी दे खायला व भूक कशी लागते तेही सांग.”” जयश्री म्हणाली.

आईने तिला खाण्यासाठी एका वाटीमध्ये एक गोलगुटुंग पांढराशुभ्र मधुर व मस्तपैकी नरम असलेला छानसा तिच्या आवडीचा शेंगदाण्यांचा पौष्टिक लाडू दिला व पुढे म्हणाली, “”आपल्या अन्नातून आपल्या शरीराला अत्यंत उपयुक्त अशी पौष्टिक द्रव्ये मिळत असतात. त्या पौष्टिक द्रव्यांपासून आपल्या शरीरात रक्त तयार होते, उर्जा निर्माण होते व शरीराची म्हणजे पेशींची झीज भरून निघते. रक्तातील ही पोषणतत्वे कमी झाल्याचा संदेश मेंदूतील क्षुधाकेंद्राकडे वा भूक केंद्राकडे जातो. हे भूक केंद्र पोट, जठर व आतड्यांना आदेश देऊन उद्दीपित करते व त्यांतील स्नायूंचे आकुंचन प्रसरण होते, आतड्यांत पाचकरस तयार होणे सुरू होते. या क्रियेने मेंदू व पोटाद्वारे आपणास भुकेची संवेदना होते. म्हणून आपल्या शरीरात चांगले रक्त तयार होण्यासाठी, भरपूर उर्जा निर्माण होण्यासाठी व शरीराची झीज व्यवस्थित भरून निघण्यासाठी नेहमी घरचे सात्विक, सकस, शुध्द, हलके, पौष्टिक व पाचक अन्नच खावे. बाहेरचे अति उष्ण, तिखट, तेलकट, मसालेदार, निकस, चमचमीत पदार्थ मुळीच खाऊ नयेत. ते शरीराला अपायकारक असतात. त्यांनी उलट पोट बिघडते, कधी कधी अपचन हाते व पोटही दुखते.””

“”पोटात कावळे कसे ओरडतात आई?”” जयश्रीने प्रश्न केला.
आई म्हणाली, “”जास्त भूक लागल्यास आपण अस्वस्थ होतो. अति जास्त भूक लागल्यास थोड्या वेळाने आपल्या पोटात दुखू लागते. त्यालाच आपण “पोटात कावळे ओरडणे” किंवा “पोटात उंदीर धावणे” असे म्हणतो. अन्न पोटात गेले नि रक्तातील पोषणतत्वांचे प्रमाण पुन्हा पहिल्यासारखे झाले की आपली खाण्याची इच्छा कमी होत जाते. ज्यावेळी खाण्याची इच्छा पूर्ण कमी होते त्यावेळी आपण “पोट भरले” असे म्हणतो.””

“”मग जेवण झाल्यानंतर ढेकर कसा काय येतो ग आई?”” जयश्रीने विचारले.
“”ज्यावेळी आपण अन्न खातो त्यावेळी अन्ननलिकेतून घास जठरात गेल्यानंतर अन्ननलिकेचे जठराकडील तोंड बंद होते. जेवतांना प्रत्येक घासाबरोबर थोडी थोडी हवासुध्दा अन्ननलिकेतून पोटात जाते. तसेच पाणी पितांनाही प्रत्येक घोटासोबतसुध्दा थोडी थोडी हवा पोटात जाते. अशाप्रकारे जेवण संपेपर्यंत पोटात म्हणजे जठरात भरपूर हवा साठते. परंतु अन्नाच्या साठ्यामुळे ही हवा जठरात कोंडली जाते. हवा ही अन्न व पाणी यांच्यापेक्षा हलकी असल्याने ती वर येण्याचा प्रयत्न करते. तसेच अन्नाचे पचन होत असतांना जठरात काही वायू तयार होऊन तेही या हवेत मिसळतात. त्यामुळे जठरातील हवेचा दाब वाढतो व अन्ननलिकेचे जठराकडील तोंड उघडते आणि ती जोरात घशावाटे बाहेर पडते.

अन्ननलिकेचा घेर कमी असतो. त्यामुळे अन्ननलिकेतून तोंडात येतांना व तेथून बाहेर पडतांना या वायूंचा आवाज होतो. यालाच आपण ढेकर येणे असे म्हणतो. ढेकर येणे हे पोट भरल्याचे लक्षण असते. जेवण झाल्यावर एक-दोन वेळा ढेकर येणे हे नैसर्गिक असते. पण जास्त ढेकर येणे हे अनारोग्याचे लक्षण असते. अति जागरण, जास्त तेलकट, तूपकट, तळलेले पदार्थ खाल्ल्याने, जेवणाच्या वेळा अनियमित झाल्याने असे जास्त ढेकर येतात.”” आईने सांगितले. जयश्री ढेकर देत उठली व आपल्या अभ्यासाला लागली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Previous article
Next article
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -