राज्यात २ लाख २० हजार ६९२ जागा अजूनही रिक्तच
पुणे : अकरावी प्रवेशासाठी (11th Admission) तीन नियमित आणि पाच विशेष फेऱ्या राबवूनही प्रवेशाच्या तब्बल २ लाख २० हजार ६९२ जागा रिक्तच राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यात अकरावी प्रवेशाच्या तीन नियमित आणि पाच विशेष अशा एकूण आठ फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. दहावीच्या परीक्षेत ९५ टक्क्यांहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण होऊनही अकरावी प्रवेशासाठी कुणी विद्यार्थी देता का विद्यार्थी? अशी परिस्थिती यंदा निर्माण झाली आहे.
या फेऱ्या संपल्यानंतर उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार अमरावती, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे विभागात प्रवेशासाठी १ हजार ७२७ महाविद्यालये उपलब्ध आहेत. या महाविद्यालयांमध्ये ६ लाख २७ हजार ६७० जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी ४ लाख ९३ हजार ९०४ विद्यार्थ्यांनीच नोंदणी केलेली आहे. उपलब्ध जागांच्या १ लाख ३३ हजार ७६६ विद्यार्थ्यांनी नोंदणी देखील केली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तर, नोंदणी झाल्यानंतर आणि प्रवेशाच्या आठ फेऱ्या झाल्यानंतर प्रवेशाच्या २ लाख २० हजार ६९२ जागा रिक्त राहिल्या आहेत. त्यामुळे अकरावी प्रवेशाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याचे स्पष्ट झाले आहे.
शैक्षणिक संस्थांवर विद्यार्थी शोधण्याची वेळ
विद्यार्थ्यांचा पारंपरिक शिक्षणाऐवजी कौशल्य शिक्षणाकडे जास्त कल वाढत आहे. यातूनच पॉलिटेक्निक, आयटीआय किंवा अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांकडून विशेष पंसती दिली जात आहे. तर, शैक्षणिक संस्थांचे न झेपणारे शैक्षणिक शुल्क, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शहरात शिक्षणास येण्यास नकार, यासह अन्य कारणांमुळे विद्यार्थी अकरावी प्रवेशाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.
विभागनिहाय अकरावी प्रवेशाच्या रिक्त जागा
मुंबई विभाग रिक्त जागा १ लाख ३७ हजार ५०४ पुणे विभाग रिक्त जागा ४३ हजार १९६ नागपूर विभाग रिक्त जागा नाशिक विभाग रिक्त जागा २२ हजार ८७० १० हजार ८०३ अमरावती विभाग रिक्त जागा ६ हजार ३१९ एकूण रिक्त जागा २ लाख २० हजार ६९२
पुण्यात ४३ हजार जागा प्रवेशासाठी रिक्तच
पुण्यात यंदा अकरावी प्रवेशासाठी ३४३ महाविद्यालयांमध्ये १ लाख २० हजार ८०५ जागा उपलब्ध आहेत. या जागांसाठी १ लाख ३ हजार ५९३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. म्हणजेच, उपलब्ध जागांपैकी १७ हजार २०५ विद्यार्थ्यांनी अर्जच केले नसल्याचे दिसून येत आहे. तर, नोंदणी केलेल्या विद्याथ्यपैिकी ७७ हजार ६०९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, अद्यापही प्रवेशासाठी ४३ हजार १९६ जागा रिक्तच राहिल्या आहेत.