Share

संवाद – गुरुनाथ तेंडुलकर

लहानपणी गोष्टीच्या पुस्तकात वाचलेली एक गोष्ट.
एका साधूच्या आश्रमात एक उंदीर शिरला आणि त्याने त्या साधूच्या पायाशी लोळण घेतली. उंदीर भ्यायलेला होता. भीतीनं थरथरत होता. साधूनं त्याच्या पाठीवरून प्रेमानं हात फिरवला आणि भीतीचं कारण विचारलं, त्यावेळी तो घाबऱ्या घुबऱ्या आवाजात म्हणाला, ‘महाराज मला वाचवा. एक मांजर माझ्या मागे लागलंय.
मला वाचवा.’

साधू म्हणाला, ‘भिऊ नकोस. तुला मांजराची भीती वाटते ना? मी तुलाच मांजर करून टाकतो मग तर झालं?’
साधूनं मंत्र म्हटला आणि त्या उंदराचं रूपांतर एका सुंदर बोक्यात केलं. उंदीर त्याच्या नव्या रूपावर खूश झाला. आता त्याला मांजरीची भीती नव्हती. उलट त्याच्या जीवावर उठलेली ती मांजर आता हा रुबाबदार बोका आपल्याला साथी म्हणून लाभावा म्हणून त्याचा अनुनय करीत होती.

उंदीर आपल्या या रूपावर खूश होता.
काही दिवस मजेत गेले आणि एके दिवशी पुन्हा तो बोका साधूच्या आश्रमात आला. पुन्हा तसाच भेदरलेला.
‘आता काय झालं रे? भ्यायलास का?’ साधूनं विचारलं.

‘अहो काय सांगू महाराज, दोन कुत्रे माझ्या मागे लागलेत. मी कसाबसा जीव घेऊन पळालो तो इथं…’ बोका झालेला उंदीर धापा टाकत होता.
‘ठीक आहे मी तुला कुत्राच करून टाकतो…’ साधूनं मंत्र म्हटला आणि कमंडलूतलं पाणी शिंपडलं. त्या बोक्याचं रूपांतर कुत्र्यात झालं.
इतका छान रुबाबदार कुत्रा पाहून गावातल्या एका श्रीमंत माणसानं त्याला आपल्याबरोबर घरी नेला. तिथं त्याच्या मोठ्या वाड्यावर त्या कुत्र्याची छान बडदास्त ठेवली गेली. आता त्या कुत्र्याला कसलीच काळजी नव्हती. भरपूर खावं, प्यावं. कंटाळा आला तर मजेशीर हिंडून यावं. कुणी परका माणूस दिसला तर त्याच्या अंगावर गुरकावं. मांजरांच्या मागे धावावं त्यांना घाबरवून सोडावं.
मज्जाच मज्जा…

एके दिवशी त्या कुत्र्याला एक ससा दिसला. त्या सशाला पकडण्यासाठी तो त्याच्यामागे धावला. ससा पुढे अन् कुत्रा मागे… ससा जीव घेऊन पळत होता आणि कुत्रा त्याला पकडायच्या ईर्षेनं त्याच्या मागे मागे पळत होता. पळता पळता ससा एका बिळात शिरला आणि नाहीसा झाला. कुत्र्यानं आजूबाजूला पाहिलं आणि त्याच्या ध्यानात आलं की, सशाच्या मागे पळता पळता आपण मुख्य वस्तीपासून बरेच दूर एका जंगलात आलो आहोत. संध्याकाळही झाली होती. सूर्य मावळतीला चालला होता. ‘लवकर परतायला हवं…!’ असं स्वतःशीच म्हणून, सशाचा नाद सोडून कुत्रा माघारी वळला तोच त्याला एक अजस्त्र डरकाळी ऐकू आली. ढगांच्या गडगडाटांसारखा, पण तरीही काहीसा वेगळा आवाज. पूर्वी कधीही न ऐकलेला. त्या आवाजाच्या दिशेनं पाहिलं आणि त्या कुत्र्याची पाचावर धारणच बसली. एक वाघ त्याच्याकडे पाहत उभा होता.

ज्या भीतीनं ससा पळाला त्याहून अधिक वेगानं कुत्रा पळाला आणि तडक त्या साधूच्या आश्रमात आला.
‘काय रे असा वाघ मागे लागल्यासारखा काय धावत आलास?’ साधूनं विचारलं.
‘अहो वाघ मागे लागल्यासारखा नाही. खरोखरीच वाघ मागे लागला होता.’ कुत्र्याने सगळी हकीकत साधूला सांगितली.
पुन्हा या खेपेलादेखील साधूनं मंत्रसामर्थ्यानं त्याचं रूपांतर एका वाघात केलं.
खूश झालेला कुत्रा डरकाळी फोडत जंगलाच्या दिशेनं निघाला. पण…
पण पुन्हा काही दिवसांनी तो त्या साधूच्या आश्रमात परतला. पुन्हा घाबरलेला. भेदरलेला.
‘आता काय रे झालं?’

वाघ म्हणाला,‘काय सांगू महाराज. जंगलात मस्त मजेत होतो. राजासारखा राहात होतो. पण काही माणसं आली. त्यांच्या हातात बंदुका होत्या, त्यापैकी एकाने नेम धरून माझ्यावर गोळी झाडली. मरता मरता वाचलो आणि इथे आलो.’ वाघाने आपली कैफियत मांडली.

‘ठीक आहे.’ मी तुला आता माणूसच करतो मग तर झालं?’ बोलता बोलता साधूनं मंत्रसामर्थ्याने वाघाचं रूपांतर एका सुंदर तरुणात केलं. साधूला नमस्कार करून तो तरुण आश्रमातून बाहेर पडला. काही वर्षांनंतर पुन्हा घाबऱ्या घुबऱ्या अवस्थेत आश्रमात आला.
‘काय रे आता
काय झालं?’
‘काय सांगू महाराज, तुम्ही मला माणूस केल्यानंतर मी इथून निघालो. काही दिवस एका धर्मशाळेत काढले. तिथून एका खानावळीमध्ये नोकरीला राहिलो. त्या खानावळवाल्याची एकुलती एक मुलगी माझ्या प्रेमात पडली. आम्ही लग्न केलं…’
‘मग पुढे…’

‘पुढे काय महाराज ! आज सकाळी माझं बायकोबरोबर भांडण झालं. ती लाटणं घेऊन माझ्या मागे लागली. मी घाबरून तुमच्याकडे आलो. महाराज मला वाचवा. मला बायकोची भीती वाटते हो.’
साधू म्हणाला, ‘हे बघ, तू उंदीर होतास त्यावेळी तू मांजराला घाबरत होतास म्हणून मी तुला मांजर केलं. त्यानंतर तुला कुत्र्याची भीती वाटू लागली म्हणून मी तुला कुत्रा केलं. त्यानंतर वाघ आणि आता माणूस… आता माणसाहून अधिक काही करणं मला शक्य नाही रे…’

‘तसं नाही महाराज, मला बायकोची भीती वाटते पण माझी बायको मात्र उंदराला घाबरते. मला परत उंदीर करा…!’
अगदी शालेय जीवनात वाचलेली ही गंमतीदार गोष्ट. त्यावेळी केवळ एक मजेशीर गोष्ट एवढंच ध्यानात आलं होतं, पण पुढे मानसशास्त्राचा अभ्यास करताना लक्षात आलं की, या जगात प्रत्येकाला कसली ना कसली तरी भीतीही असतेच. सामान्य शेतकरी दुष्काळ पडेल म्हणून धास्तावतो. सावकार दरोडा पडेल म्हणून धास्तावतो. दरोडेखोर पोलिसाला घाबरतो. पोलीस राजकारणी मंत्र्यांना टरकून असतात. मंत्र्यांची भीती आणखीनच वेगळी. त्यांना सत्ता जाईल ही भीती. प्रत्येकाची भीती वेगळी.

अर्थात प्रत्येकाच्या भीतीची कारणं वेगवेगळी. तरुण नटीला वाढत्या वयाबरोबर कमी होणाऱ्या सौंदर्याची भीती, तर म्हाताऱ्या माणसाला मृत्यूची भीती.

प्रत्येक जीवाला जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत कसली ना कसली तरी भीती असतेच. अगदी पहिला श्वास घेण्यापासून ते शेवटचा श्वास सोडण्यापर्यंतच्या आयुष्यात माणसाला भीतीची सोबत सतत असते.

काही शास्त्रज्ञ म्हणतात की, ही भीती अगदी जन्माच्या आधीच जन्माला येते. असेलही कदाचित.
मूल जन्माला येण्यापूर्वी आईच्या पोटात अगदी सुरक्षित असतं. तो ऊबदार अंधार आणि आयतं मिळणारं अन्न… काहीही करायची गरज नसते. अगदी स्वतःहून श्वासही घेण्याची गरज नसते. म्हणूनच ते मूल बाहेर पडताना कष्टी होतं. आपली हक्काची सुरक्षित जागा सोडून बाहेर येताना विरोध करतं. पण निसर्गनियमानुसार त्याला बाहेर पडावंच लागतं. बाहेर पडता क्षणीच त्याला भीती वाटते. उजेडाच्या भयानं ते डोळे मिटून घेतं. बाहेरच्या मोकळ्या हवेत घुसमटतं आणि टाहो फोडतं. त्याचा तो पहिला ‘टॅहँ…!’ त्या पहिल्या टॅहँतून ते पहिला श्वास घेतं आणि पुढे त्याची ही भीती संपते.
एक भीती संपली की दुसरी सुरू होते…

वास्तविक पाहाता भीती कसलीही असली तरी भीतीची कारणं केवळ दोनच. पहिलं म्हणजे जे आहे ते नष्ट होईल याची भीती…
आणि दुसरं म्हणजे…
जे हवं आहे ते मिळणार नाही याची भीती.
बस्स. या दोन कारणाव्यतिरिक्त भीतीसाठी तिसरं कारणच नाही.

जगातील सगळ्या भीतींचा उगम ‘मी आणि माझं’ या भावनेतूनच होतो. हे माझं आहे. ते माझ्याच मालकीचं राहायला हवं. ते नष्ट होता कामा नये, हरवता कामा नये, कुणी हिरावून घेता कामा नये यासाठी खटाटोप आणि दुसरं म्हणजे जे मला मिळवायचं आहे ते नाही मिळालं तर…? माणूस जरी वर्तमानकाळात जगत असला तरी भीती नेहमी भविष्यकाळासंबंधीच असते. म्हणूनच ज्याने भविष्यकाळाची चिंता सोडली आणि भूतकाळ गाडून टाकला अशा संतत्वाला पोहोचलेल्या माणसाला भीती उरत नाही. ज्याने भूतकाळाशी आणि भविष्यकाळाशी असणारा संग सोडून जो निस्संग झाला त्याला भीतीची भीतीच नाही.
म्हणूनच समर्थ रामदास स्वामी म्हणतात :

भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे।
भयातीत ते संत आनंत पाहे।
जया पाहता द्वैत काही दिसेना ।
भय मानसी सर्वथाही असेना ।।
आपण सर्वसामान्य माणसं. आपण अशाप्रकारे संतत्वाला पोहोचू शकत नाही. पण तरीदेखील जर स्वतःच्या कर्तृत्वावर आणि त्या परमात्म्याच्या दातृत्वावर विश्वास ठेवला तर आपणही दैनंदिन जीवनात निर्भयतेनं जगू शकतो.

Recent Posts

LSG vs DC, IPL 2025: लखनऊचे दिल्लीला १६० धावांचे आव्हान

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…

32 minutes ago

कामगार कायद्यांमध्ये सुधारणा; महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार

मुंबई : केंद्रीय कामगार संहितेच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र वेतन संहिता नियम, २०२५ आणि…

57 minutes ago

Rafrigerator Care: फ्रिज भिंतीपासून किती अंतरावर असावा?

Rafrigerator Care: सध्या उन्हाळा प्रचंड वाढला असून,या काळात एसी , कूलर पाठोपाठ थंडगार पाणी तसेच…

1 hour ago

Gond Katira: दगडासारखी दिसणारी ही गोष्ट उन्हाळ्यात आहे अतिशय फायदेशीर

मुंबई: उन्हाळ्यात आपले शरीर थंड ठेवणे अतिशय गरजेचे असते.कारण या मोसमात अॅसिडिटी, डायरिया तसेच पचनासंबंधित…

2 hours ago

Kolhapur News : कोल्हापुरात ट्रक आणि एसटी बसची जोरदार धडक!

कोल्हापूर : राज्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. एसटी बस, ट्रक यांचे अपघात सर्रास पाहायला…

2 hours ago

Lalit Machanda Suicide: ‘तारक मेहता….’ फेम अभिनेते ललित मनचंदा यांनी ‘या’ कारणांमुळे केली आत्महत्या

मेरठ: शुभांगी अत्रे यांच्या माजी पतीच्या निधनानंतर, टीव्ही इंडस्ट्रीमधून आणखी एक वाईट बातमी समोर येत…

2 hours ago