बाप्पांना निरोप देताना मन आपसूकच दाटून येते. गेले काही दिवस गणरायाच्या आगमनामुळे सर्वत्र चैतन्यमय वातावरण होते. देशभरात सामाजिक एकात्मतेचे प्रतीक म्हणून साजरा होणारा सार्वजनिक गणेशोत्सव लोकमान्य टिळकांमुळे सामाजिक एकोप्याचा सण बनला खरा, पण या उत्सवाने सणाचे पावित्र्य, समाजाला होणारे फायदे-तोटे आणि एकूणच साजरीकरणाबद्दल गांभीर्याने विचार करायलाही भाग पाडले.
प्रासंगिक- शंतनू चिंचाळकर
अखेर बाप्पाला निरोप देण्याची घटिका समोर आली. गेले काही दिवस गणरायाच्या आगमनाने सर्वत्र चैतन्यमय वातावरण पसरले होते. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतात सामाजिक एकात्मतेचं प्रतीक म्हणून साजरा होणारा उत्सव म्हणजे गणेशोत्सव. सुरुवातीला घरोघरी साजऱ्या होणाऱ्या या चैतन्य सोहळ्याला लोकमान्य टिळकांमुळे सार्वजनिक गणेशोत्सवाचे सामाजिक एकोपा असलेले रूप आले. आबालवृद्धांना आपल्याशा वाटणाऱ्या सर्वसमावेशक अशा या उत्सवाने निरोपाच्या वळणावर पावित्र्याबद्दल, समाजाला होणाऱ्या फायद्या-तोट्यांबद्दल आणि साजरीकरणाबद्दल गांभीर्याने विचार करायला भाग पाडले. त्याला कारणेदेखील अनेक होती. सालाबादप्रमाणे दर वर्षी उत्सवामध्ये येणारा तोचतोचपणा, त्यात अपेक्षित असलेले वेगळेपण आणि उत्सव संपल्यावर त्यातून सामाजिक पातळीवर काय बदल जाणवले, त्यातून आवर्जून वर्णन करावे असे काय फलित निघाले या विचारांची चक्र अनंत चतुर्दशीचा दिवस जवळ येऊ लागला तशी डोक्यात फिरू लागली.
बऱ्याच सार्वजनिक मंडळांच्या गणपतींचे सातव्या अथवा दहाव्या दिवशी विसर्जन होते. सोसायट्यापुरत्या मर्यादित असलेल्या मंडळांकडून यंदादेखील फार अपेक्षा नव्हत्या. कारण मर्यादित संख्येने असलेल्या सभासदांकडून गोळा होणाऱ्या अल्पशा वर्गणीतूनही त्यांनी सालाबादप्रमाणे सामाजिक संदेश देणारे देखावे, मनोरंजनाचे दर्जेदार कार्यक्रम, बाळगोपाळांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. अशा छोटेखानी पण सार्वजनिक स्वरूपाच्या गणेशोत्सवात सोसायटीतल्या ज्येष्ठ सभासदांनी मंडळांच्या कार्यक्रमावर वैयक्तिक लक्ष दिल्याचे जाणवत होते. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या वागणुकीत शिस्त आणि सभासदांनी वर्गणी रूपाने दिलेल्या पैशाच्या होणाऱ्या अनावश्यक व अवाजवी खर्चावर नियंत्रण ठेवले गेले. उत्सवाची ही एक जमेची बाजू म्हणावी लागेल. असे असले तरी मोठ्या प्रमाणावर वर्गणी गोळा करणाऱ्या आणि सार्वजनिक ठिकाणी साजऱ्या
होणाऱ्या मंडळांवर पुरेसा अंकुश असल्याचे जाणवत नाही.
समाजात मानाचे स्थान असलेल्या एखाद्या अग्रणी देणगीदाराच्या मदतीतून अनेक मंडळांचे अर्थकारण उभे राहते. अशा मंडळांकडून जल्लोश आणि दिखाऊ साजरीकरणापलीकडे फार काही साधत नाही. असे प्रकार थांबावेत म्हणून एक गाव, एक गणपती किंवा एक प्रभाग, एक गणपती असे स्तुत्य उपक्रम राबवण्याचे आवाहन मंडळांना करणे, पण वर्चस्ववाद श्रेयवाद यापायी ती आवाहने झुगारून देणे यंदाही जाणवले. दर वर्षी महानगरपालिकेने, पोलीस खात्याने मांडवांबद्दल त्यांच्या सार्वजनिक रस्त्यांवरील व्याप्तीबद्दल स्पष्ट निर्देश दिलेले असतात. मात्र स्थानिक नेत्यांच्या, पुढाऱ्यांमार्फत दबाव आणून नियम झुगारून दिल्याचे जाणवते. यंदाचे वर्षही त्याला अपवाद ठरले नाही. यंदाही अनेक मांडवांनी रस्ते अडवण्याकामी महत्त्वाची भूमिका बजावलीच. संपूर्ण शहरात वाहतुकीचा बोजवारा उडवणारे मोठमोठे मांडव सालाबादप्रमाणे जैसे थे अवस्थेतच दिसले.
काही मंडळांपुढे असलेल्या डॉल्बी सिस्टीमचा आवाज हा नियमाने ठरवून दिलेल्या मानकांपेक्षा बराच जास्त होता हे देखील लक्षात आले. त्यावर आणि लेझर प्रकाश यंत्रणेवर कुणाचाही अंकुश जाणवला नाही. महागाईमुळे बाजाराची उलाढाल दरवर्षीप्रमाणे ठिकठाक म्हणण्यासारखीच होती. अनेक ठिकाणी व्यापारी आणि दुकानदारांनी सजावटीच्या साहित्यात नव्याने गुंतवणूक करण्यापेक्षा मागील वर्षीचा स्टॉक खपवण्यावर भर दिल्याचे जाणवले. बाजारात आलेल्या पर्यावरणपूरक शाडू मातीच्या मूर्ती तशा महाग आणि सामान्यांना परवडण्यासारख्या नव्हत्या असे म्हणणे वावगे ठरू नये. ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर विक्री करणाऱ्या काही स्टॉल्सवर एक एक फुटाच्या मूर्त्यादेखील १४००-१५०० रुपयांना मिळत होत्या. यावरून मूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारांच्या हाती काय पडले असेल आणि मध्यस्थांनी किती कमावले असेल याची कल्पना यावी.
बळीराजाची हलाखीची परिस्थिती पाहता पूजा साहित्यामधील फुले आणि ऐन उत्सवांच्या आणि सणासुदीच्या काळात वाढणाऱ्या त्यांच्या किमती हा चर्चेचा विषय ठरावा. एरवी किरकोळ भावात मिळणाऱ्या गुलाबाच्या एका फुलाला १५-२० रुपयांचा भाव मिळत होता. इतर वेळी २०-२५ रुपयांना मिळणारा फुलांचा हार ५० रुपयांना मिळत होता. मार्केट यार्डच्या ठोक बाजारात ३० रुपयांना मिळणारी गड्डी मध्यस्थाचे कमिशन, उत्पादन खर्च आणि वाहतुकीचा खर्च जाता शेतकऱ्याला किती किंमत मिळवून देत असेल हे देखील विचार करण्यासारखे आहे. अर्थात हे वर्षानुवर्ष चालत आले आहे. त्यात काही बदल नाही आणि हेच पाहायला आपण दर वर्षी त्या बाप्पाला ‘पुढच्या वर्षी लवकर या’ असे म्हणतो. गणेशोत्सवावर पोट असणाऱ्या या मूर्तिकारांसाठी, मळे पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारकडून अनुदानाची काही तरी घोषणा होईल अशी आशा दर वर्षी लागून असते. आपण भावामध्ये जास्त तोलमोल न करता त्यांचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल हे पाहतो, कारण तेवढेच आपल्या हातात असते.
अनंत चतुर्दशी संपताच भक्तांच्या अंगातला उत्साह निवळून जाईल. काही दिवस काहीशी रुखरुख लागून राहील. पण ती गणेशोत्सव संपला म्हणून नसेल, तर पूर्वापार एकाच पठडीत साजऱ्या होणाऱ्या या उत्सवात आपल्याला किंवा संबंधित यंत्रणांना आवर्जून वर्णन करावेत असे कोणतेच स्वागतार्ह बदल करता आले नाहीत यासाठी असेल. घरी एक दिवस मुक्कामी असलेली पाहुणे मंडळी जाताना देखील आपले मन हेलावून जाते. इथे तर आपण प्रत्यक्ष गणाधीशाला निरोप देत असतो. वर्षभरात आपल्या हातून कळत-नकळत घडत असलेली पापं उदरात साठवून नष्ट करण्यासाठी स्वतः जलसमाधी घेणाऱ्याला निरोप देताना मन उचंबळून येते. अर्थात विरहामुळे होणाऱ्या दुःखापेक्षा या उत्सवाचे पावित्र्य जपण्याच्या दृष्टीने, आपला सांस्कृतिक वारसा टिकवण्याच्या दृष्टीने, दर वर्षीचा तोच तोच रटाळपणा टाळण्याच्या दृष्टीने फारसे ठोस प्रयत्न झाले नाहीत, ही अपराधीपणाची भावना जास्त सतावून जाते.
श्री गजानन हा विश्वव्यापक, चराचरात सामावलेला देव आहे. तो निर्गुण, निराकार आहे. पण भक्तांच्या प्रेमापोटी तो दहा दिवस साकार मूर्तीच्या रूपात पाहुणा म्हणून येतो. त्याची दहा दिवस भेट झाल्यावर, त्याचे ते साकार रूप पुन्हा निराकारात एकरूप होणे क्रमप्राप्तच असते. म्हणूनच गणेशाचे विसर्जन केले जाते. पण या विसर्जन कथेवरून माणसाने चराचरात, प्रत्येक माणसात ईश्वर आहे हे जाणूनच आचरण ठेवावे, हा बोध घ्यावा. श्री गणेशाला निरोप देताना आपण ‘गणपती बाप्पा मोरया’ म्हणतो. त्या ‘मोरया’ या शब्दाचा अर्थ नमस्कार करणे असा आहे. अशा लाडक्या बाप्पाला निरोप देताना निघणारी विसर्जनाची मिरवणूक ही सामान्य जनतेसाठी मोठी अपूर्वाई आणि आनंद लुटण्याची पर्वणी असते. या मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे सगळी माणसे भक्तिभावात दंग होऊन मनसोक्त नाचत असतात. या वेळी कुणी कसेही नाचले तरी कुणीही कुणाला हसत नाही. याच वेळी रस्त्यात खाद्यपदार्थ, खेळणी, विविध अानुषंगिक वस्तू विकणाऱ्यांची लगबगही मजा वाढवत असते. लाऊडस्पीकरवरची गणपतीची गाणी, ढोल-ताशांचा आवाज, विक्रेत्यांची गडबड यामुळे एकूणच वातावरणात उत्साहाची कारंजी उसळत असतात. त्या चैतन्यात चिंब भिजून आपल्याला जगायला नवसंजीवनी मिळते.
पुण्यातल्या मानाच्या पहिल्या कसबा गणपतीसमोरची मिरवणूक तर राजेशाही थाटाची असते. हत्तीदळ, घोडदळ, लयबद्ध लेझीम, ढोल-ताशांच्या ठेक्यात भगवा झेंडा नाचवणारे शाखेचे उत्साही सभासद असा नुसता पाहत राहण्यासारखाच थाट असतो. तसंच वैभवशाली अशा दगडू हलवाईची मध्यरात्री निघणारी मिरवणूक हा तर स्वर्गीय इंद्रप्रस्थाच्या वैभवाची आठवण देणारा अनुभव असतो. मुंबईतले अनेक गणपती छोट्या इमारतींएवढ्या उंचीचे असतात आणि त्याची मिरवणूकही अशीच प्रेक्षणीय असते. या गणपतींचे विसर्जन समुद्रातच केले जाते. अर्थात पाण्यात विसर्जित केलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या गणेशमूर्ती नीट पाण्यात विरघळत नाहीत आणि त्या मूर्तींची खरे तर विटंबना होते. त्याचाही विचार करायला हवा. शिवाय अशा मूर्ती बनवताना वापरले जाणारे रंग अनेक प्रकारची द्रव्ये, रसायने एकत्र करून तयार केले जातात. त्यामुळे मूर्ती विसर्जित केल्यावर पाणी प्रदूषित होते. त्यामुळे विसर्जनानंतर मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होते. असे होऊ नये, यासाठी पाण्यात विरघळतील अशाच पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करणे हा राजमार्ग आहे. अशा मूर्ती बनवण्यासाठी समाजाला वारंवार आवाहन केले जात आहे. या आवाहनाला हळूहळू उत्तम प्रतिसाद मिळू लागला आहे. सुशिक्षित समाज अशा पाण्यात विरघळणाऱ्या मूर्ती स्वतः घरी बनवतो किंवा विकत घेतो आणि विसर्जन घरातच स्वच्छ पाण्याच्या बादलीत करतो. यातच गणेशमूर्तीचा सन्मान आहे, असे वाटते. (अद्वैत फीचर्स)