नवी मुंबई : केंद्र सरकारच्या (Central Government) ‘स्वच्छ भारत मिशन’च्या वतीने प्राप्त निर्देशानुसार १४ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा पंधरवडा’ साजरा करण्यात येत असून या अंतर्गत ‘स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता’अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून त्यामधील ‘एक पेड माँ के नाम’ हा एक अभिनव उपक्रम सेक्टर ३६, नेरूळ येथील गणपतशेठ तांडेल मैदानाजवळील उद्यानात संपन्न झाला.
याप्रसंगी विधानसभा सदस्य आ. गणेश नाईक, महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार आणि इतर उपस्थितांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. शहरात पशूपक्ष्यांचा अधिवास वाढेल अशा ३०० हून अधिक देशी वृक्षरोपांची यावेळी लागवड करण्यात आली. ज्यामध्ये जांभूळ, वड, पिंपळ, आंबा, फणस, मोहोगणी, आवळा, पेरू, चिक्कू, सीताफळ, करंज, अर्जुन, बकुळ, सीता, अशोक, काजू, आंबा, वड, पिंपळ, करंज आदी वृक्षारोपण करण्यात आले.