कथा – रमेश तांबे
मी एकटाच समुद्रकिनारी बसलो होतो. संध्याकाळची वेळ होती. समुद्र शांतपणे हेलकावे घेत होता. सूर्य समुद्रात बुडण्याच्या तयारीत होता. पश्चिम दिशा लाल रंगाची उधळण करत होती. आजूबाजूला बऱ्यापैकी गर्दी होती. त्यांचा कलकलाट कानावर पडत होता. पण मी मात्र अगदी शांत बसलो होतो. निसर्गाच्या छान सुंदर वातावरणाशी माझा काहीच संबंध नव्हता. माझ्या मनात काल घडलेला तो प्रसंग वारंवार येत होता आणि माझे डोळे भरून येत होते.
माझ्या विचित्र स्वभावाचा मला पश्चाताप होत होता. आदल्या दिवशी शाळेत घडलेला तो प्रसंग जशाचा तसा मला डोळ्यांसमोर दिसत होता. सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी मी वर्गावर पोहोचलो. बहुतेक मुलं वर्गात आली होती. सकाळचे राष्ट्रगीत, संविधान प्रतिज्ञा, प्रार्थना सारे काही आटोपून मुलांची हजेरी घेतली. हजेरी घेताना मुले येेस सर म्हणत होती. पण एका नावाशी येऊन मी थांबलो.
गणेश शंकर दवणे हा मुलगा गेली पंधरा दिवस शाळेत आलाच नव्हता. तरीही मी ते नाव पुकारले. पण वर्गातून काहीच उत्तर आले नाही. मी वर्गात सर्वत्र नजर फिरवली पण गणेश दिसतच नव्हता. पुन्हा एकदा नाव उच्चारले पण नाहीच. मग कोणीतरी म्हणाले, “सर तो शाळेत येतो पण तुमच्याच तासाला तो बसत नाही.” हे ऐकून मला प्रचंड राग आला. माझ्या तासाला वर्गात बसत नाही म्हणजे काय? माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. मी अगदी रागातच तो तास पूर्ण केला आणि तिरमिरीतच शिक्षकांच्या रूममध्ये जाऊन बसलो. माझ्या तासाला बसत नाही. मी काही चांगले शिकवत नाही? मी कमी दर्जाचा शिक्षक आहे काय? माझ्या मनात असंंख्य प्रश्नांचा भडीमार चालू होता. आता दुसरा तास सुरू झाला. गोखले सरांचा तास सुरू होताच मी हातात पट्टी घेऊन रागातच वर्गात शिरलो. पाचव्या बाकड्यावर शंकर शांतपणे बसला होता. मी तडक त्याच्याजवळ गेलो आणि सपासप त्याच्या हाता- पायावर, पाठीत पट्ट्या मारण्याचा सपाटा लावला. वर्गातली सारी मुलं भेेदरून गेली. कोणीच मधे पडले नाही. शेवटी गोखले सर धावत आले आणि म्हणाले, “सर आवरा स्वतःला. मुलांना असं मारणं चांगलं नाही.”
मी हातातली पट्टी तिथेच टाकून शिक्षक रूममध्ये जाऊन बसलो. पाच-दहा मिनिटे मी रागाने नुसता धुमसत होतो. तेवढ्यात, “सर आत येऊ का? असे आर्जवी वाक्य माझ्या कानावर पडले. मी मागे वळून पाहिले, तर गणेश शंकर दवणे दरवाजात उभा! तो भरल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहत होता. मी काही बोलण्याच्या आतच तो मला म्हणाला, “चुकलो सर, माफी असावी. उद्यापासून मी बसेन तुमच्या वर्गात. खरंच बसेन.” मी रागातच म्हणालो, “मग एवढे दिवस का नाही बसलास? अन् तेही फक्त माझ्याच वर्गात!” “नाही सर; तसं काही कारण नाही. तुम्ही जे समजता तसं काहीच नाही सर. खरं तर मला तुमचं शिकवणं फार आवडतं. पण माझ्या आईमुळे मला बसता येत नाही तुमच्या तासाला!”
आईचं नाव काढताच मी प्रश्नार्थक मुद्रेने त्याच्याकडे बघू लागलो. शंकर भरल्या डोळ्यांनी सांगू लागला. सर सध्या माझी आई आजारी पडली आहे. अंथरुणातच पडून असते ती. मग तिची सगळी कामे मलाच आवरावी लागतात. ते सगळं आवरेपर्यंत वेळ होतो आणि म्हणून मला उशीर होतो सर. बोलता बोलता तो हमसून हमसूून रडत होता. मी लगेच खुर्चीवरून उठलो. त्याचा हात हातात धरला. त्याला मारून आपण खूप मोठी चूक केली याची मला जाणीव झाली. कोणतीही चौकशी न करता मी त्याला मारले. यात केवळ माझा अहंकार आडवा आला होता. माझ्या तासाला बसत नाही म्हणजे काय! माझे डोळे भरून आले. शंकरला मी जवळ घेतले. त्याच्या डोक्यावरून हात फिरवत डोळ्यांतले पाणी आडवत म्हटलं, “बाळ शंकर, माफ कर मला. मी अपराधी आहे तुझा!”