Sunday, October 6, 2024

घडी

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ

चार दिवसांपूर्वीची गोष्ट. माझी मदतनीस (कामवाली) कपडे घडी घालत होती. मी बाजूला कोणते तरी पुस्तक वाचत बसले होते. डोळ्यांच्या कोपऱ्यातून तिचे कामही पाहत होते. तिने टी-शर्टला घडी घातल्यावर लगेच तो टी-शर्ट मी माझ्या हातात घेतला आणि माझ्या पद्धतीने त्याला घडी घातली आणि तिच्या हातात दिला. ती हसून म्हणाली, “कपड्यांच्या बाबतीत तुम्ही खूपच काटेकोर आहात!”

हा प्रसंग घडल्यावर गेले दोन-चार दिवस मला सतत माझे लहानपण आठवत आहे. कळत्या वयापासून मी माझे कपडे स्वतः धुवायची. मला कामवालीने किंवा आईने कपडे धुतलेले आवडायचे नाही. बराच वेळ खर्च करून मी अतिशय स्वच्छ कपडे धुवायची. त्या काळात आमच्या घरात इस्त्री नव्हती म्हणजे खाऊन पिऊन सुखी असलेले आमचे कुटुंब घरात सहज इस्त्री विकत घेऊ शकत होते… पण का इस्त्री घेतली नव्हती, ते काही माहीत नाही. असो. माझ्या शेजारपाजारच्या मैत्रिणींसारखी मीही गॅसवर पातेले गरम करून ते चिमट्याने धरून कपड्यांवर इस्त्री करायचे. मग ते कपडे कपाटात, मला दिलेल्या भागात व्यवस्थित ठेवायची. कपडे घातल्यावर सुद्धा त्याच्यावर डाग पडू नये, याची मी काळजी घ्यायची. पावसाळ्याच्या दिवसात पांढरे कपडे घालणे टाळायची कारण त्याच्यावर जे चिखल-मातीचे शिंतोडे उडतात ते सहजासहजी निघू शकत नाहीत म्हणून; हिवाळ्याच्या दिवसात आम्ही जे स्वेटर किंवा कोट वापरायचो त्याला व्यवस्थित आतून- बाहेरून ऊन दाखवून ठेवायची.

माझ्या मोठ्या बहिणीमध्ये आणि माझ्यात फक्त एका वर्षाचे अंतर होते. आम्हा दोघींचेही वजन अनेक वर्षे साधारण चाळीस किलोच्या आसपास असावे त्यामुळे एकमेकींचे कपडे आम्हाला सहज व्हायचे. मी शाळा- कॉलेजमध्ये गेलेले असताना जर माझ्या बहिणीला म्हणजे ताईला कुठे जायचे असेल, तर ती पटकन माझे कपडे घालून जायची कारण ते स्वच्छ धुतलेले, व्यवस्थित इस्त्री केलेले असायचे. मला जेव्हा हे कळायचे तेव्हा तिचे माझे भांडण व्हायचे. तरीही परत परत ती तसेच करायची. साधा हातरुमाल असो किंवा डोक्याला लावायच्या पिना, सेफ्टी पिना अशा प्रत्येक वस्तू मी अतिशय व्यवस्थित ठेवायची त्यामुळे त्याही ती लागेल तेव्हा वापरायची.

लहानपणी खेळताना आमचे कपडे कधी उसवायचे, फाटायचे. त्याची बटणं निघायची इ. गोष्टी घडल्या की ताई सरळ ते कपडे टाकून द्यायची. अनेक महिने किंवा वर्ष त्याकडे तिचे लक्षही जायचे नाही परंतु जेव्हा मला वेळ मिळायचा तेव्हा मी तिने टाकून दिलेले कपडे व्यवस्थित शिवायची, जिथे फाटलेले असेल तिथे लेस लावायची किंवा एखाद्या धाग्याने एम्ब्रोईडरी करायची. बटणे तुटलेली असतील, काजे मोठे झाले असेल तर ते दुरुस्त करायची. त्या कपड्यांना स्वच्छ धुऊन इस्त्री करून वापरायच्या उद्देशाने कपाटात ठेवायची. ताई ते कपडे उचलून घालायची आणि फिरायला जायची. ते पाहून मला खूप राग यायचा. मी तिला म्हणायची, “तू टाकून दिलेले कपडे आहेत त्याला मी दुरुस्त केले आहे. आता तू त्याला कशाला हात लावतेस?” तर ती म्हणायची, “ते माझे कपडे आहेत. मी हात लावणार नाही तर आणखी कोण?” अशा तऱ्हेने आमच्या भांडणाला नवनवीन विषय मिळायचे.

हे सगळे वाचून आपल्यालाही आपल्या भावंडांच्या बाबतीतील भांडणे आणि भांडणाचे विषय नक्कीच आठवले असतील ना? त्या भांडणात ही गंमत होती. एकमेकांविषयीचे प्रेम होते. जवळकिची भावना होती. खरोखरी गंमत होती.

दीर्घकाळ गेल्यावर मला हे आठवले आणि मला या गोष्टीची गंमत वाटतेय की माझी मुलगी ही अगदी माझ्यासारखीच तिच्या कपड्यांच्या बाबतीत खूपच पर्टीक्युलर आहे. तिला अगदी घरात वापरायच्या कपड्यांच्यासुद्धा व्यवस्थित घातलेल्या घड्या लागतात. तिचे कपाट कधी कधी मला एखाद्या मॉलमधील कपाटासारखे वाटते. माझ्याकडून माझ्या मुलीने घेतलेला हा एक चांगला गुण आहे, याचा मला अभिमान वाटतो.

प्रत्येक माणसामध्ये चांगल्या- वाईट सवयी असतात म्हणजे जर कपड्यांच्या बाबतीत मी खूप पर्टिक्युलर असले तरी कदाचित जेवणाच्या बाबतीत माझी तितकी गती किंवा आवड नसू शकते, तर आणखी कोणाच्या बाबतीत ती व्यक्ती अतिशय उत्तम स्वयंपाक करणारी असू शकेल; परंतु कपड्यांच्या बाबतीत इतकी रुची ठेवत नसेल! आपल्यातील काही वाईट गुण खरं तर आपणच ओळखण्याची गरज आहे. त्याला सुधारण्याची गरज आहे. एखाद्याला एखाद्या गोष्टीच्या बाबतीत रुची नसेल, व्यवस्थितपणा नसेल तर त्याला समजून घेण्याचीसुद्धा तेवढीच आवश्यकता आहे! त्यामुळे कुटुंबातील एकमेकांच्या भावनिकतेची घडी निश्चितपणे विस्कटणार नाही!

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -