टर्निंग पॉइंट – युवराज अवसरमल
फौजी या नव्या चित्रपटातून प्राजक्ता गायकवाड आपली अभिनयाची झलक दाखवणार आहे. या चित्रपटामध्ये देशासाठी रक्षण करणाऱ्या सैनिकाचा प्रवास पाहायला मिळणार आहे. प्राजक्ताचं शिक्षण पुण्यातील टॉपच्या हुजूरबागा मुलींच्या शाळेत झाले. त्यानंतर पुण्याच्या सरकारी पॉलिटेक्निक कॉलेजमधून तीन वर्षांचा कॉम्प्युटर इंजिनीअरिंगचा डिप्लोमा पूर्ण केला. नंतर पुणे युनिव्हर्सिटीच्या कॉलेजमधून कॉम्प्युटर इंजिनीअरिंगची डिग्री पूर्ण केली. गेल्या वर्षी तिने शूटिंग सुरू असताना डिग्री देखील पूर्ण केली. शिक्षणाची आवड तिला पहिल्यापासून होती. ग्लॅमरस क्षेत्रामध्ये काम करून देखील तिने शिक्षणाला प्राधान्य दिले. पुढे देखील शिक्षण सुरू ठेवण्याचा तिचा मानस आहे.
तिने शाळेत असताना अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतला होता. अनेक एकांकिका, महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा, मराठी व हिंदी वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला. जवळजवळ सर्व स्पर्धेमध्ये तिला बक्षीस मिळाले आहे. तिला वाचनाची प्रचंड आवड निर्माण झाली. जर आपण चांगलं बोलू शकतो तर आपण आपले मत मांडले पाहिजे. आपल्याला वक्तृत्वाची छान कला देवाने दिली आहे याची जाणीव तिला शाळेत असतानाच झाली होती. जर एखादी स्पर्धा असेल तर शिक्षक हमखास तिचे नाव द्यायचे. ती देखील त्या स्पर्धेमध्ये बक्षीस मिळवायची. शाळेला देखील तिचा अभिमान वाटायचा. शाळेत साजरा होणाऱ्या अनेक सण, उत्सवामध्ये तिचा सहभाग असायचा.
शालेय शिक्षण झाल्यानंतर तिने सरकारी पॉलिटेक्निक कॉलेजला कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या डिप्लोमाला प्रवेश घेतला. त्यावेळी तिच्या जीवनात टर्निंग पॉइंट आला. तिला झी मराठी वाहिनीवर ‘नांदा सौख्य भरे’ या डेली सोप मालिकेमध्ये काम करण्याची संधी मिळाली. जवळ जवळ पावणेदोन वर्षे या मालिकेमध्ये तिने अभ्यास सांभाळून काम केले.
मालिकेच्या शूटिंगला जाताना प्रवासामध्ये ती अभ्यास करायची. शूटिंगच्या वेळेस सेटवर असताना वेळ मिळाला तर ती तिथे देखील अभ्यास करायची. अभ्यासासोबत अभिनयावर देखील तिने लक्ष केंद्रित केले होते. गेल्या महिन्यात तिचा ‘गुगल आय’ चित्रपट रिलीज झाला; परंतु त्या चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान देखील तिला अभ्यासासाठी तारेवरची कसरत करावी लागली होती. कधी ती चित्रपटाच्या शूटिंगसाठी हैदराबादला असायची, पुण्याला आल्यावर ती अभ्यास करायची, अशा प्रकारे अभिनयासोबत तिने अभ्यासाला देखील प्राधान्य दिले.
फौजी या चित्रपटात तिची फौजीच्या पत्नीची भूमिका आहे. पत्नी कणखर असल्याने, तिच्या पाठिंब्यामुळे फौजी निर्धास्त होऊन देशसेवा करीत असतो. या चित्रपटात सैनिक आणि त्याच्या कुटुंबीयांच्या शौर्याची स्फूर्तिदायक कथा पाहायला मिळेल. दोन जवानांचे आयुष्य आणि त्यांची निस्सीम देशभक्ती या चित्रपटामध्ये पाहायला मिळेल. या चित्रपटात प्राजक्ता प्रथमच सौरभ गोखले सोबत काम करीत आहे. सौरभची फौजीची भूमिका आहे. पहिल्यांदाच एकत्र काम करीत असून ही त्यांच्यात चांगली मैत्री झाली. एकमेकांच्या भूमिका, त्या भूमिकेची गरज ओळखून एकत्र काम केल्यामुळे एकमेकांकडून भरपूर गोष्टी शिकायला मिळाल्याची भावना प्राजक्ताने व्यक्त केली. प्रेक्षक या चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद देतील असे तिला वाटते. प्राजक्ताला तिच्या फौजी चित्रपटासाठी हार्दिक शुभेच्छा!