भालचंद्र कुबल – पाचवा वेद
आजवर नवीन नाटक रंगमंचावर आले की, त्याची समीक्षासदृश लेख लिहून जाहिरात करण्याची पारंपरिक प्रथा अनेक वर्षांपासून मराठी नाट्यसृष्टीत प्रचलित आहे. समीक्षाकारांची परिक्षणे वाचून प्रेक्षकांनी नाटक बघायला जाणे म्हणजे वारंवार फुटणाऱ्या पालिकेच्या फवाऱ्यावरून नायगाऱ्याची कल्पना करण्यासारखे असते. त्यामुळे मराठी समीक्षाकारांनी स्वतःच्या लेखनामुळे मराठी नाटक चालते हा गोड अपसमज (असलाच तर तो) विसरायला हवा. खरंतर समाज माध्यम असा राक्षस आहे. ज्याला कितीही कंटेंट खायला घाला, तो उपाशीच असतो. अशावेळी ही समीक्षा त्या भस्म्याच्या पोटी पडते. पाचशे-हजार शब्दांचा तो कंटेंट नाटकाशी संबंधित असणाऱ्या प्रत्येकाचा गोड गोड पापा घेणारा असतो. सक्काळी सक्काळी असा कुणी घेतलेला गालगुच्चा किमान आठवडाभर तरी नाटकवाल्याला परीच्या पिसासारखा हवेत हिंदकळवत ठेवतो. काही दिवसांनी त्या नाटकांचा प्रेक्षकवर्ग संपतो आणि नाटक बंद होते. कोविड काळानंतर नाटक या माध्यमात अामूलाग्र बदल झाले. हे बदल ज्या निर्मात्यानी अंगीकारले ते तरले आणि बाकी सर्व वारले. त्यांची यादी जाहीर करण्यासाठी हात शिवशिवतायत, पण उगा अवमान नको निर्मात्याच्या अज्ञानाचा, म्हणून गप्प राहाणेच इष्ट समजतो मी. तर मुद्दा होता नाटकाच्या सर्वायव्हलचा (बाय द वे सर्वायव्हलला मराठीत अचूक आणि समर्पक शब्द नाही, बरं का…!) नाटक जगावे म्हणून जी जी काॅम्प्रमायजेस नाट्यनिर्मात्यांना पोस्ट कोविड काळात कराविशी वाटली, ती एक थिअरी बनून गेली मात्र त्याला काही नाटकांचा अपवाद होता, “चारचौघी” त्यापैकीच एक…!
अपवाद का? तर लार्जर दॅन लाईफ या अँगलने चारचौघींकडे कधी बघितलेच गेलेले नाही. अगदी १५ आॅगस्ट १९९१ पासूनच्या नाट्यसमीक्षेत, स्त्रीच्या स्वतंत्र विचारधारेचे नाटक, स्त्रीयांच्या भावनिक अस्तित्वांचे प्रश्न मांडणारे नाटक, स्त्रीयांच्या जगण्याला नवा दृष्टिकोण देणारे नाटक, पुरुषप्रधान संस्कृतीला खडे बोल सुनावणारे नाटक, दोन्ही पिढ्यांचे सर्वसमावेशक विचार अधोरेखित करणारे नाटक, स्त्रीचे समाजातील स्थान बळकट करणारे नाटक, अशा कितीतरी हेडिंगच्या समीक्षा गेल्या ३२ वर्षांत वाचायला मिळाल्या. बी.ए.च्या सिलॅबसमध्ये आणि परिसंवाद-चर्चासत्रातून जेवढा प्रोपागंडा चारचौघींचा झाला तेवढा कुठल्याच नाटकाचा झाला नाही. पहिल्या आवृत्तीत निर्मात्या लता नार्वेकरांनी मराठी प्रेक्षकांना अशा क्रांतिकारी नाटकांची सवय नाही, असे गृहीत धरून अनेक छोटेखानी इव्हेंट घडवून आणून नाटकाला मोठे केले. यात चुकीचे असे काहीच नव्हते कारण लता नार्वेकरांकडे नाटक मोठे करण्याची हातोटी आणि स्ट्रॅटेजी दोन्ही होती.
दीपा लागूंसारखी सामाजिक चळवळीचे भान असणारी नाट्यकर्मी पहिल्या आवृत्तीत होती. शिवाय आसावरी जोशी, प्रतीक्षा लोणकर आणि वंदना गुप्तेंसारख्या कलाकारांनी स्वतःच्या अभिनय कौशल्याने उभ्या केलेल्या व्यक्तिरेखा म्हणजे समर्थ नाट्याभ्यास होता. दुसऱ्या आवृत्तीबाबतही तेच म्हणावं लागेल. रोहिणी हट्टंगडींच्या अभिनयाची एक बाजू आणि मुक्ता बर्वे, कादंबरी कदम आणि पर्ण पेठे यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखांसाठी दिग्दर्शकीय सूचनांव्यतिरिक्त त्यांना स्वतःला करायला लागलेल्या अभ्यासाचे धडे स्वतंत्र आहेत व पुढेही असतील. गेल्या ३२ वर्षांत या नाटकाबाबत जेवढे सकारात्मक बोलले गेले असेल, तेवढे सकारात्मक भाष्य नाटकाचा प्लाॅट करत नाही. योगायोगाने चार जणींचे चार प्रश्न मांडणारे एक कुटुंब कथा रूपाने जेव्हा उभे राहाते तेव्हा योगायोगांचे लाॅजिक बाजूला ठेऊन प्रेक्षक प्रत्येक व्यक्तिरेखेच्या सबप्लाॅटमध्ये गुंतत जातो. कथानकाची बांधणी लेखकांने काही गृहितके शक्याशक्यतेच्या पातळीवरून हाताळली असली तरी त्यात न पटण्याजोगे काही नाही. उदाहरणार्थ एकाच कुटुंबाच्या वाट्याला एवढे प्रश्न येण्याला लाॅजिक एकच की नाटक बोलतं राहावं. या नाटकात प्रत्येकीचे विचार बोलते राहतात म्हणून चारचौघी चटके देत रहातात. या नाटकात मांडलेल्या विचारांच्या लाॅजिकची कनेक्टिव्हीटी एवढी भन्नाट आहे, की ते तुम्हाला वैयक्तिक पातळीवर घेऊन जातं.
मराठी रंगभूमीवर लार्जर दॅन लाईफ या कॅटेगरीत मोडणारी अनेक नाटके येऊन गेली. नटसम्राट, गगनभेदी, काही ऐतिहासिक नाटके, वस्त्रहरण, काही शेक्सपिरीअन नाटके, हिमालयाची सावली इत्यादी, परंतु त्यात “चारचौघी” दर्जा असून सुद्धा गणले गेल्याचे कुठल्याही समीक्षकाने उल्लेखिलेले नाही. चारचौघी या नाटकाचा आवाका खरंतर ब्राडवेवरील माऊस ट्रॅप सारखा वर्षांनुवर्षे चालू शकतो, इतकं ते लार्जर दॅन लाईफ आहे. मुळात या नाटकाकडे स्त्रीवादी दृष्टिकोणातून पाहिले आणि अभ्यासले गेले. दोन पिढ्यांच्या ३६० अंशांच्या वैचारिक मुद्यांवर बोलले व लिहिले गेले, परंतु स्त्रीयांची मानसिक, शारीरिक, आर्थिक आणि आत्मीक विचारसरणी वैश्विक पातळीवर एकाच पटलावर मांडता येते हे प्रशांत दळवी यानी सिद्ध केले आहे, म्हणून हे नाटक किंगसाईझ आहे. व्यक्तिरेखांच्या अनुषंगाने मागोवा घ्यायचा झाल्यास बरंच काही आणि मंचावरील अदृष्य व्यक्तिरेखांबद्दलही लिहावं लागेल.
हा चारचौघी या नाटकाबाबतचा “निरोप लेख” आहे. पुढल्या काही दिवसांत श्रीपाद पद्माकर आणि चंद्रकांत कुलकर्णी यांनी निर्मिलेली दुसरी आवृत्ती बंद होईल. काॅर्पोरेट सेक्टरमध्ये एखाद्या कंपनीत रुजू होताना जसा जाॅइनिंग इंटरव्ह्यू घेतला जातो तसाच तो त्या उमेदवाराचा कंपनी सोडताना एक्झिट इंटरव्ह्यू देखील घेतला जातो. या लेखाबाबत थोडेफार असेच आहे. हा या नाटकासाठी लिहिला गेलेला, नाटक बंद होण्याच्या पार्श्वभूमीला समजून घेत लिहिलेला निरोप लेख आहे. पोस्ट कोविड थिअरीला न जुमानणारे, स्त्रीत्वाची मूल्ये वैश्विक पातळीवर जपणारे आणि वैचारिक पातळीवर बोलाल तर लार्जर दॅन लाईफ असणारे हे नाटक बंद होईल पण ते तात्पुरते असेल आणि या बंद होण्यातच तिसऱ्या आवृत्तीचे वेध लागलेले असतील.