Sunday, October 6, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्सरंगकर्मींचे 'गावाकडचे गणपती'...!

रंगकर्मींचे ‘गावाकडचे गणपती’…!

मुंबई ही अनेक कलावंतांची कर्मभूमी आहे आणि महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणांहून बरेच रंगकर्मी कलाक्षेत्रात नाव मिळवण्यासाठी मुंबईत येऊन स्थायिक झाले आहेत. पण गणेशोत्सवाच्या दिवसांत मात्र या मंडळींचे गाव त्यांच्या डोळ्यांसमोर नाचू लागते आणि गावाकडच्या गणपतींच्या आठवणी त्यांच्या मनात रुंजी घालू लागतात…

राजरंग – राज चिंचणकर

‘येळवण’चे धुमशान…

गणपतीची प्राणप्रतिष्ठापना झाली की, नंतरचे दिवस म्हणजे नुसते धुमशान आणि हे सगळे मी अनुभवतो, ते कोकणातल्या राजापूर तालुक्यातल्या आमच्या ‘येळवण’ गावात! आमच्या गावच्या वाडीतले गणपती म्हणजे केवळ उत्साहाचा माहोल! आरत्यांमध्ये लागणारा उच्च स्वर आणि रात्रीच्या वेळी चालणारी भजने हे या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य! वाडीतल्या विविध घरांत येणाऱ्या गणपतींमुळे वातावरण अतिशय प्रसन्न झालेले असते. एखाद्या घरात भजन सुरू असते; तर दुसऱ्या एखाद्या घरात बायकांची फुगडी रंगलेली असते.

गणपतीतला गौरी पूजनाचा दिवस सुद्धा महत्त्वाचा! पण गौरीपूजनाच्या आदल्या रात्री मात्र वेगळीच चर्चा असते आणि ती म्हणजे दुसऱ्या दिवशीच्या मटणाचा मेनूची! त्यासाठीच्या मसाल्याची आणि वड्याच्या पिठाची तयारी करण्यासाठी घरातल्या स्त्रिया तर मध्यरात्रीच कामाला लागलेल्या असतात. जशी गौरीपूजनाची आदली रात्र विशेष असते; तसेच गणपती विसर्जनाच्या आधीची रात्र जागरणाने गाजवली जाते. वाडीतले सगळे गणपती घरी येताना भातशेतांच्या बांधावरून रांगेत येतात; त्याचप्रमाणे विसर्जनाच्या वेळी सर्व गणपती नदीजवळ एका माळावर रांगेत बसवले जातात. त्यांच्यामागे विविध रूपे घेतलेल्या गौरी असतात. विसर्जनाच्या वेळीही विविध खेळ खेळले जातात आणि गणपती-गौरींचे विसर्जन केले जाते. गावाकडचे गणपती म्हणजे माझ्या आयुष्यातला महत्त्वाचा भाग आहे.

– राजेश देशपांडे (लेखक-दिग्दर्शक)

‘कोल्हापूर’ची कलासंस्कृती…

कला, साहित्य आणि नाट्यक्षेत्रातले माझे शिक्षण गणपतीच्या मांडवातच सुरू झाले. आमचा गणेशोत्सव हा कोल्हापूरचा! गणेशोत्सवाच्या दिवसांत सांस्कृतिक कार्यक्रमांची मोठी पर्वणी असायची. ज्येष्ठ व श्रेष्ठ साहित्यिक, कवी मंडळी विविध कार्यक्रमांत सहभागी व्हायची. पण इतकेच नाही; तर या दहा दिवसांत कथाकथन करणारे कलावंत आणि त्याचबरोबर नकलाकार, एकपात्री कलाकारही या कार्यक्रमांत त्यांची कला सादर करायचे. अनेक व्याख्याते, जादूगार मंडळी यांचेही कार्यक्रम गणेशोत्सवात व्हायचे. एकंदर समृद्ध करणारा असा तो अनुभव असायचा. गणेशोत्सवात सिनेमा दाखवण्यासाठी रस्त्यावर मोठे पडदे लावले जायचे. कितीतरी सिनेमा आम्ही या उत्सवातच पाहिले. उत्सवात विविध कलापथकेही सामील व्हायची. या कलापथकांच्या माध्यमातून मला नाटक कळत गेले आणि नाटकाची आवड इथेच मनात रुजली. कलेसोबतच या उत्सवाने मनोरंजनाचे क्षेत्र माझ्यासाठी खुले केले. गणेशोत्सव म्हणजे माझ्यासाठी सांस्कृतिक उत्सवच आहे.

– अभिराम भडकमकर (नाटककार-लेखक)

‘चिपळूण’च्या गौरी…

कोकणातल्या गणपतींचे वैशिष्ट्य त्यांच्या आगमनापासूनच सुरू होते. माझे बालपण चिपळूणला गेले. कोकणात शेतावरच्या बांधांवरून एकामागोमाग एक असे गणपती घरोघरी आणले जातात. आमचा गणपती आणायला मी माझ्या वडिलांसोबत जात असे. बाप्पाला घरी घेऊन येताना कच्च्या रस्त्यांवरून पायी चालत आम्ही यायचो. कोकणातल्या गणेशोत्सवात आम्हा मुलांसाठी आनंदाची गोष्ट असायची, ती म्हणजे गणपतीच्या सणाला आम्हाला नवीन कपडे
घेतले जायचे.

गणपतीनंतर गौरी घरी यायची. गौरीचा थाट मोठा असायचा. गौरीसाठी संपूर्ण घर सजायचे. गौरी उभी करणे हाही एक सोहळा असायचा. स्वच्छ धुतलेली चादर माच्यावर अंथरायची, त्यावर मंडपी, मग त्याला गौरीचे हात, तेरडा, वगैरे! या सगळ्यांनी घरातले वातावरण बदलून जायचे. जिव्हाळा आणि मायेचे नाते ही गौरी घरच्यांच्या सोबत निर्माण करायची. साहजिकच, गौरीचे विसर्जन हा हृद्य सोहळा बनून जायचा. गौरी जायला निघायची; त्या दिवशी तिच्या आवडत्या पदार्थांचा नैवेद्य तिला दाखवला जायचा. अशावेळी गौरीचे रूप अधिकच तेजस्वी वाटायचे. मध्यरात्री घरातल्या स्त्रीया कंदिलाच्या प्रकाशात गोलाकार बसायच्या आणि परात व लाटणे फिरवत गाणी गायली जायची. हे सर्व आता आठवतानाही कोकणातला गौरी-गणपतीचा सण डोळ्यांसमोर जसाच्या तसा उभा राहतो.

– प्रभाकर मोरे (अभिनेता)

‘पवारसाखरी’चा बाप्पा…

आम्हा कोकणी लोकांचा मोठा सण म्हणजे गणपती उत्सव! या उत्सवाच्या पूर्वतयारीसाठी दोन दिवस तरी कोकणातल्या घरी पोहोचणे, ही प्रथाच आहे. गुहागरच्या जवळ असलेले ‘पवारसाखरी’ हे माझे गाव! मुंबईचे चाकरमानी गणपतीला कोकणातल्या गावी हटकून येतात. आमच्याकडे गौरीचे ओवसे असतात आणि हा दिवस महत्त्वाचा असतो. कारण या दिवशी देवाला जाखडी घातली जाते आणि त्यासाठी सगळे गावकरी आमच्या घरी येतात.

गणपतीची एक वेगळी आठवण माझ्या कायम लक्षात राहिली आहे. काही वर्षांपूर्वी आम्ही गणपतीची मूर्ती मुंबईहून करवून घेतली होती. विशेष म्हणजे ही मूर्ती कोकणात नेण्याची जबाबदारी माझ्यावर होती. त्यासाठी मी गाडी तयार ठेवली होती. महत्त्वाचे म्हणजे, या गाडीचे सारथ्य करणार होता तो सिराज हा मुस्लीम माणूस! आमचा हा सिराज दर मंगळवारी सिद्धिविनायकाची वारी करणाऱ्यातला आहे. तर गणपतीची ती मूर्ती मी आणि सिराजने गावाला नेली होती. अर्थात तेव्हाही रस्त्यात खड्डे होतेच; त्यामुळे मूर्ती गावाला नेण्यासाठी आम्हाला कसरत करावी लागली होती. पण सरतेशेवटी आम्ही सुखरूप कोकणातल्या घरी पोहोचलो. हा प्रवास आणि हा अनुभव मी कधीच विसरू शकणार नाही.

– प्रमोद पवार (अभिनेता-दिग्दर्शक)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -