मुंबई : सोमवारी १६ सप्टेंबर रोजी मुस्लिम बांधवांचा ‘ईद-ए-मिलाद’ (Eid a Milad) हा सण साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी देशभरातील सर्व शैक्षणिक संस्थांसह सर्व सरकारी कार्यालये, न्यायालये, बँका आणि शाळांना सुट्टी (Holiday) असते. मात्र या सार्वजनिक सुट्टीबाबत सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे १५ सप्टेंबर रोजी रविवार आणि १७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थी अशा सलग तीन दिवस सुट्टी असल्यामुळे अनेकांनी बनवलेले हॉलिडेचे प्लॅनिंग काहीसे बिघडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
‘ईद मिलाद उन- नबी’ यासाठी राज्य सरकारने शासकीय सुट्टी जाहीर केली होती. मात्र १७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थी असल्याने दोन्ही सणांमध्ये शांतता आणि सलोखा कायम राहावा, यासाठी मुंबई शहर आणि उपनगरासह इतर जिल्ह्यांमध्ये मुस्लिमधर्मियांनी जुलूस काढण्याचा निर्णय १८ सप्टेंबर रोजी घेतला आहे. त्यामुळे १६ सप्टेंबर रोजी देण्यात येणारी शासकीय सुट्टी रद्द करून १८ सप्टेंबर रोजी देण्यात येणार आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र काढून निर्णय घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, नंदुरबार जिल्ह्यात हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती निमित्त सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी मुस्लीम समाज बांधवांनी १६ ऐवजी १९ सप्टेंबर रोजी मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रशासन आणि पोलीस यंत्रणांवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.