मद्यधुंद तरुणांच्या गाडीच्या धडकेत चौघांचा मृत्यू
छ. संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये १० वर्षांनंतर झालेल्या बाळाच्या बारशातून परतणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातला. मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्या दोन तरुणांच्या स्कॉर्पिओने त्यांच्या कारला जोरदार धडक (Accident) दिली. यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये आई, बाळ, आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
ही दुर्घटना वाळुज एमआयडीसी परिसरातील नगर रोडवर घडली. दारू पिऊन स्कॉर्पिओ चालवणाऱ्या विशाल चव्हाण (२२) आणि कृष्णा केरे (१९) यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
राज्यात हिट अँड रनच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, हे अपघात गंभीर स्वरूपाचे ठरत आहेत. या प्रकरणाने मद्यधुंद वाहनचालकांवर कारवाई करण्याचे आवाहन नागरिकांकडून करण्यात येत आहे.